आदिवासींच्या वाट्याला दूषित पाणी; आरोग्याचा प्रश्न गंभीर

| सुधागड-पाली | वार्ताहर |

रायगड जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. येथील डोंगर खोऱ्यात आदिवासी बांधव वास्तव्य करतात. रानमेवा, मासळी, लाकूडफाटा विकणे व मोलमजुरी करणे हा यांचा प्रमुख व्यवसाय. यासाठी त्यांना रानोमाळ भटकावे लागते. अशावेळी सध्याच्या कडाक्याच्या उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी त्यांची आबाळ होताना दिसत आहे. मग रणरणत्या उन्हात तहान भागविण्यासाठी ओढे, नदी, नाले, तलाव येथील शिल्लक पाणी नाईलाजाने प्यावे लागते. तळाला गेलेलं हे पाणी चिखल, जीवजंतू व शेवाळमिश्रित असते, त्यामुळे आदिवासींच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


माणगाव तालुक्यातील विळे येथील शिक्षक राम मुंडे यांनी सांगितले की, पक्षी निरीक्षणासाठी येथे एका ठिकाणी गेलो होतो. त्यावेळी नदीच्या पात्रात आटत आलेल्या पाण्यामध्ये वयस्कर आदिवासी जोडपे मासे पकडत असताना दिसले. महत्त्वाची गोष्ट ही होती की, मासे पकडायला बराच वेळ लागणार असल्याने या झोडप्याने बाटल्यांमध्ये तेच घाण पाणी भरून ठेवलं होतं. ते पाणी पाहून आजीला विचारलं, हे पाणी कशाला भरून ठेवलं आहे? त्यावेळी तिने प्यायला भरून ठेवलं आहे, असे सांगितले. आजीचे हे उद्गार ऐकून मुंडे स्तब्ध झाले. कारण एवढं घाण पाणी जर आपल्याला तोंड धुवायला जरी दिलं तरी त्या पाण्याने आपण तोंड धुवू शकणार नाही, असे पाणी ते पिणार होते. अशीच परिस्थिती इतरही ठिकाणची आहे. त्यामुळे आदिवासी कष्टकरी समाजाच्या वाट्याला असे दूषित पाणी पिण्याची वेळ येणे खूप क्लेशदायक आहे, असे मुंडे म्हणाले.


आदिवासी वाड्यापाड्यात राहणाऱ्या आदिवासी बंधू-भगिनींना उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी कित्येक किलोमीटरची पायपीट करावी लागते. शिवाय जे पाणी मिळते ते अतिशय खराब व दूषित असते. आदिवासी वाड्या‌‘पाड्यांवर अजूनही पाणी पोहोचलेले नाही. त्यामुळे रानावनात कामासाठी गेलेल्या आदिवासी बंधू-भगिनींना तेथेच उपलब्ध असलेले खराब व घाण पाणी प्यावे लागते. रोजच्या जेवणाची भ्रांत असलेल्या आदिवासींना विकतचे पाणी पिणे कसे परवडणार? यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे, याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

जंगलात किंवा छोट्या-छोट्या वाड्या वस्त्या करून राहणारा हा समाज कामासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात आणि राज्यात बरेच महिने स्थलांतरित होत असतो. पिढ्यान्‌‍पिढ्या गरिबीत राहणार हा समाज आजही पूर्णतः निसर्गावरच अवलंबून राहणे पसंत करत आहे.

राम मुंडे, पक्षी निरीक्षक व सहाय्यक शिक्षक, पाटणूस
Exit mobile version