नागरिकांचा संताप, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
। पनवेल । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने 36 तासांचा पाणीपुरवठा बंद (ब्लॉक) केल्यानंतर शनिवारी (दि.14) सकाळी खांदा वसाहत परिसरात सिडकोकडून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र, नळातून लाल व गढूळ पाणी आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. हे पाणी पिण्यासाठी तर दूरच, परंतु, दैनंदिन वापरासाठीही अयोग्य असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
अनेक सोसायट्यांच्या पाण्याच्या टाक्यांमध्येही लालसर गढूळ पाणीच भरले गेले आहे. तर काही ठिकाणी पाणीपुरवठाच झाला नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मिनरल वॉटरच्या बाटल्या खरेदी करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न यामुळे गंभीर झाला आहे.
स्थानिकांच्या मते, अलीकडेच करण्यात आलेल्या पाण्याच्या पाइपलाईन कामामुळे ही समस्या निर्माण झाली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
दरम्यान, लोकप्रतिनिधींनी या गंभीर समस्येकडे गांभीर्याने व प्राधान्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, तसेच सिडकोकडून स्वच्छ आणि शुद्ध पाणीपुरवठा कधी सुरू होणार, याबाबत स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी खांदा वसाहत परिसरातील नागरिकांनी केली आहे.






