नागरिकांचे आरोग्य धोक्यात
| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
नवीन पनवेल सेक्टर 17 पीएल 5 येथील 1 ते 24 इमारतींमध्ये मागील काही दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत असून, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सिडको प्रशासनाला याबाबत कल्पना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. दूषित पाणीपुरवठा थांबला नाही, तर सिडकोवर मोर्चा काढत जाब विचारला जाईल, असा इशारा येथील रहिवासीनी दिला आहे. नवीन पनवेल या भागामध्ये सतत दूषित मातीमिश्रित पाणीपुरवठा होत आहे. आधीच कमी दाबाने पाणीपुरवठा होत असताना त्यातही दूषित, गढूळ पाण्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. नवीन पनवेल परिसरात अनेक ठिकाणी लहान मुलं व वयोवृद्ध नागरिक आजारी पडत आहेत. लहान मुलांमध्ये कॉलरा, डायरिया याची साथ पाहायला मिळत आहे. दूषित पाणीपुरवठा त्वरित थांबवावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा येथील स्थानिक रहिवासींनी दिला आहे.
