| पनवेल । वार्ताहर ।
फुटलेल्या जलवाहिनीत ड्रेनेजचे पाणी मिसळल्याने तळोजा सेक्टर अकरामधील काही सोसायटी धारकांना दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. ऐन दिवाळीतच हा प्रकार घडल्याने पालिकेविरोधात रोष व्यक्त केला जात आहे.
तळोजा सेक्टर अकरामधील गणेश मंदिर, जय शक्ती, सुमोध सोसायटीलगत असलेल्या रस्त्यावरील मलनिःसारण वाहिन्या भरून रस्त्यावर वाहत आहेत. अशातच सोमवारी या परिसरात दूषित पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार रहिवाशांनी सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाकडे केली होती. यावेळी गणेश मंदिरलगत रस्त्यावरील मलनिःसारण वाहिन्यांची पाहणी केली असता, पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यामुळे ड्रेनेजचे पाणी मिसळण्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे दिवाळी सणातच तळोजाकरांना दूषित पाणीपुरवठा झाल्याने संतापाची भावना आहे. याविषयी सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाकडे विचारणा केली असता, गळती लागलेली जलवाहिनी तत्काळ दुरुस्त केल्याची माहिती देण्यात आली.
बेकायदा नळजोडणीचे प्रकार
तळोजामध्ये सुरू असलेल्या बांधकामांना बेकायदेशीर नळ जोडणी दिली जाते. त्यामुळे जलवाहिनीला गळती लागण्याचे प्रकार घडत आहे. त्यासाठी सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांनी लक्ष केंद्रित करून अशी जोडणी देणार्या व्यक्तीवर कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
जलवाहिनीला गळती लागल्याची माहिती सिडकोच्या पाणीपुरवठा अधिकार्यांना दिली होती. त्यानंतर तत्काळ खोदकाम करून ही जलवाहिनी दुरुस्त करून घेण्यात आली.
कैलास घरत, सामाजिक कार्यकर्ते