पाथरजला मृत म्हशीमुळे दूषित पाणीपुरवठा

। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील पाथरज गावाला पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीच्या वरच्या भागातील तलावात म्हैस मृत झाली आहे. त्या म्हशीच्या शरीराचे अवयव कुजले असल्याने ग्रामस्थांना होणारा पाणीपुरवठा दूषित झाला आहे. दरम्यान, त्या दूषित पाण्याने साथीच्या आजाराची लागण होण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
कर्जत पाथरज ग्रामपंचायत मधील पाथरज गाव 80 ते 85 घरांची लोकवस्ती असलेल्या पाथरज गावाला दोन ते तीन दिवस दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. ग्रामस्थांनी गावात ज्या विहिरीमधून पाणी येते, त्या विहिरीची जाऊन पाहणी केली असता, त्या विहिरीच्या वरच्या भागात असलेल्या तळ्यात म्हैस मरून पडलेली दिसून आली. अनके दिवस ती म्हैस त्या विहिरीत पडलेली असल्याने मृत अवस्थेतील ती म्हैस सडून गेली होती. त्या तळ्यातील पाणी पाझरून विहिरीत येते, तेच पाणी पाथरज गावाती टाकीत साठवले जाते आणि ते सर्व पाणी दुर्गंधीयुक्त झाले आहे. पिण्याचे पाणी स्वच्छ मिळावे यासाठी ती विहीर काही ग्रामस्थांच्या मदतीने साफ करून त्यामधील पाणी बाहेर काढून फेकले आहे. मात्र, तरीदेखील ग्रामस्थ यांच्या मनात दूषित पाणी पिल्याने साथीचे रोगांना निमंत्रण द्यावे लागू शकते, अशी भीती निर्माण झाली आहे.

Exit mobile version