कमळ नागरी पतसंस्थेचा पुढाकारातून कार्यक्रम
| अलिबाग | प्रतिनिधी |
कमळ नागरी सहकारी पतसंस्था मर्या., अलिबाग यांच्या वतीने सालाबादप्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त अखंड भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत हा भजन सोहळा रंगणार आहे.
कार्यक्रमाचे ठिकाण काशीविश्वेश्वर मंदिर, अलिबाग शेजारी असून, भजनांच्या गजराने परिसर दुमदुमून जाणार आहे. भजनप्रेमींसाठी हा दिवस एक प्रकारे आध्यात्मिक पर्वणी ठरणार आहे. या उपक्रमाचे यंदाचे हे सलग दहावे वर्ष आहे. नामांकित भजनी मंडळींसह स्थानिक भजन गटही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. भक्तिमय वातावरणात अखंड नामस्मरण आणि भजनांचा सुरेल संगम अनुभवण्याची संधी यानिमित्त उपलब्ध होणार आहे. सर्व भजनप्रेमींनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कोकणातील अग्रगण्य पतसंस्था म्हणून ओळख असलेली कमळ नागरी सहकारी पतसंस्था गेली 34 वर्षे बँकिंग क्षेत्रात सातत्याने प्रगती करत आहे. चालू आर्थिक वर्षात एकत्रित व्यवसायाचा 1000 कोटींचा टप्पा गाठण्याचा संस्थेचा मानस आहे. आर्थिक क्षेत्रापुरते कार्य मर्यादित न ठेवता गोशाळा, डायलिसिस सेंटर, पोळी-भाजी केंद्र, रक्तदान शिबिरे, शैक्षणिक सहाय्य आणि धार्मिक उपक्रम अशा विविध सामाजिक क्षेत्रांतही संस्थेचा सहभाग उल्लेखनीय आहे. भजनी परंपरा जपण्यासाठी आणि भजन मंडळींना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम दरवर्षी सातत्याने राबविला जात असून, यंदाही मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडणार आहे.







