| पेण | प्रतिनिधी |
पेण शहरानजिक खालचा पेट्रोल पंप म्हणून ओळखला जाणार्या पेट्रोल पंपात सतत पेट्रोलचा दुष्काळ पहायला मिळतो. महत्वाची बाब म्हणजे या पेट्रोल पंपात जेव्हा पासून सी.एन.जी सुरू झाला तेव्हापासून आठवडयातून एक ते दोन दिवसच पेट्रोल पंपात पेट्रोल उपलब्ध होते. बाकी दिवस पेट्रोल संपले आहे असा बोर्ड लावला जातो. यामुळे वाहन चालकांची मोठी पंचायत होते.
पेण शहरात दुसरा असणारा पेट्रोल पंप हा रात्रीच्यावेळी बंद असतो. त्यामुळे वाहन चालकांची मोठया प्रमाणात गैरसोय होते. जर वाहन चालकांना रात्रीच्यावेळी पेट्रोलची आवश्यकता भासल्यास त्यांना तरणखोप, आंबेघर अथवा वडखळ या ठिकाणी जावे लागते. त्यामुळे नागरिकांचा नाहक वेळ व पैसा वाया जातो. तसेच हा पेट्रोल पंप महामार्गावर असून देखील रात्रीच्या वेळी अनेक वाहनधारकांना पेट्रोल न मिळाल्यामुळे त्यांची गैरसोय होत असते, तसेच सदरील पंपाची चौकशी होउन या पेट्रोल पंपावर नियमाप्रमाणे डिझेल बरोबर पेट्रोल विक्री करणेबाबत सुचना द्याव्यात अशी मागणी जोरधरू लागली आहे.