कोरस कंपनी गेटवर ठिय्या आंदोलन
| चणेरा | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक क्षेत्र पुन्हा एकदा संतप्त घोषणांनी दणाणून गेले आहे. येथील कोरस इंडिया लिमिटेड कंपनीतील कंत्राटी कामगारांनी विविध मागण्यांसाठी मंगळवारी (दि.14) सकाळी कंपनीच्या मुख्य गेटवर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. तब्बल चार तास चाललेल्या आंदोलनापुढे कंपनी प्रशासनाला कर्मचाऱ्यांपुढे झुकावे लागले आणि मागण्यांची पुर्तता करण्याचे आश्वासन देण्यात आले.
गेल्या महिनाभरापासून दिवाळी उंबरठ्यावर असतानाही धाटाव औद्योगिक क्षेत्रातील कोरस इंडिया कंपनीतील कामगारांना बोनस तर सोडाच पगार देखील मिळालेला नाही. त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कामगारांच्या घरात आनंदाचा किरण नसून काळोखी निराशा दाटलेली आहे. कंपनी प्रशासनाकडून लवकरच पगार होईल, अशी खोटी आशा देण्यात येते. मात्र, कामगारांच्या पोटाची खळगी भरणारा पगाराचा दिवस उजाडतच नाही. दिवाळी तोंडावर आली असून कुटुंबियांना नविन कपडे, मुलांना फटाके आणि घरात दिवे लावायचे देखील वांदे झाले आहेत. त्यामुळे आम्ही दिवाळी कशी साजरी करायची, असा सवाल करत शेकडो कंत्राटी कामगारांनी कोरस इंडिया कंपनीच्या गेटसमोर ठिय्या देत संताप व्यक्त केला. यावेळी ‘फक्त आश्वासन नाही, हक्क द्या’, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी आंदोलनकर्त्या कामगारांनी स्पष्ट इशारा दिला की, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत कोणताही कामगार कंपनीत पाऊल ठेवणार नाही, असा इशारा दिला.
कामगार संघटनांचे म्हणणे आहे की, गेल्या अनेक महिन्यांपासून उत्पादनाचा संपूर्ण भार कंत्राटी कामगार सांभाळत आहेत; परंतु, त्यांना योग्य तो मोबदला दिला जात नाही. त्यामुळे हा कामगारांवर आर्थिक अन्याय आहे. दिवाळी पगाराशिवाय कशी साजरी करायची, तसेच, वेळोवेळी कंपनीने दिलेली आश्वासने फक्त शब्दांपुरतीच राहिली आहेत. असे सांगत कंपनी प्रशासनाविरोधात प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान, कंपनी प्रशासनाविरोधातील हे आंदोलन तब्बल चार तास चालले. अखेर कंपनी प्रशासनाला कामगारांसमोर झुकावे लागले. या दरम्यान, कोरस इंडिया कंपनी प्रशासनात आणि कर्मचाऱ्यांत यावर चर्चा झाली. या चर्चेत कंपनीच्या एच.आर. विभागाच नवनाथ पावले यांनी, कंपनीतील सर्व कामगारांचा पगार आणि एल.टी.ए.त्वरित दिला जाईल; तर, बोनस बुधवारी (दि.15) दुपारपर्यंत वितरित होणे अपेक्षित आहे, असे त्यांनी सांगितले.







