। पालघर । प्रतिनिधी ।
काशिमीरा येथे मेट्रो मार्गीका 9 च्या कामादरम्यान रस्ता खचून डंपर उलटल्याने 25 वर्षीय चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली होती. त्यावरून एमएमआरडीएने मेट्रो कंत्राटदाराला 30 लाखाचा तसेच कामाच्या सल्लागाराला 10 लाखांचा असा एकूण 40 लाखांचा दंड आकारण्यात आला आहे.
मीरा-भाईंदर मेट्रो मार्गिका 9 चे काम सध्या प्रगतीपथावर सुरु आहे. याबाबचे कंत्राट जे कुमार या संस्थेला देण्यात आले आहे. गेल्या चार वर्षात मेट्रोचे पिलर उभारण्यासाठी खोलवर खड्डा करण्यात आल्यामुळे आसपासच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे अशा रस्त्याच्या दुरुस्तीचे कामदेखील कंत्राटदारकडून हाती घेण्यात आले आहे. दरम्यान, 4 डिसेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास काशिमीरा येथे सिमेंटने भरलेले डंपर फिरवत असताना रस्ता खचल्याने त्यात पडून आशिष कुमार (25) नामक चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली होती. या अपघातामुळे कंत्राटदाराच्या कामातील निष्काळजीपणा समोर आला आहे.