ठेकेदार आर्थिक संकटात

बाहेरच्या ठेकेदारांमुळे आली बेकारी; केलेल्या कामाची बिले अडकली

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत येथील ठेकेदार आर्थिक संकटात आहे असून बहुसंख्य ठेकेदारांची केलेल्या कामाची बिले अडकली आहेत. त्यात कर्जत तालुक्यात बाहेरचे ठेकेदार येऊन कामे करतात आणि स्थानिक ठेकेदार यांना कामे मिळत नाहीत. त्यामुळे स्थानिक ठेकेदार यांच्यावर आर्थिक कुऱ्हाड कोसळली आहे. दरम्यान ठेकेदारी वर्गात मोठ्या प्रमाणावर बेकारीची स्थिती निर्माण झाली आहे.

कर्जत तालुका ठेकेदार संघटनेची बैठक संघटनेचे अध्यक्ष राहुल डाळिंबकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कर्जत तालुक्यातील अनेक ठेकेदारांना काम मिळत नसल्याने त्यांच्या हाताला रोजगार नाही. वर्षानुवर्षे ठेकेदारी हाच व्यवसाय असणारे अनेक ठेकेदार छोटी-मोठी कामे करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. परंतु, मागील काही वर्षात बाहेरील ठेकेदारांनी कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात घुसखोरी केली. राजकीय शक्तींना हाताशी धरून ते बहुतांश कामे मॅनेज करुन परस्पर लाटत असल्याने स्थानिक ठेकेदार कामापासून वंचित राहात आहेत. याबाबत ठाम निर्णय घेण्याबाबत अध्यक्ष राहुल डाळिंबकर यांनी सल्ला दिला.
स्थानिक ठेकेदार 2-5 लाख रुपयांच्या कामासाठी विनवणी करावी लागत आहे. मात्र, बाहेरील ठेकेदार 60-70 कोटी रुपयांची कामे मिळवतो, यामुळे स्थानिक ठेकेदार बेकार झाले आहेत. बाहेरील ठेकेदार कामे मिळवताना नियमबाह्य आर्थिक देवाण-घेवाण होत असल्याने त्याच्याकडून कामाचा दर्जा राखला जात नाही. त्यामुळे यावर्षी केलेले रस्त्याचे काम पुढच्या वर्षीपर्यंत टिकत नसल्याने नागरिकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागतो. याबाबत नागरिकांनी कितीही आवाज उठवला तरी सदरचे ठेकेदार बाहेरील असल्याने त्यांना काही फरक पडत नाही.

याउलट, स्थानिक ठेकेदार काम करीत असताना आपल्या परिसरातील रस्ता चांगला व्हावा याकरिता कामाचा दर्जा राखण्यावर भर देतो. चार पैसे कमी मिळाले तरी चालतील, परंतु बदनामी नको आणि स्थानिक लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून काळजी घेतो. असे असतानादेखील बाहेरील ठेकेदार यांना झुकते माप देतात. सद्यःस्थितीत कर्जत तालुक्यात बाहेरील ठेकेदारांनी शेकडो कोटींची कामे परस्पर घेऊन ती निकृष्ट दर्जाची कामे चालू आहेत. कर्जत तालुका ठेकेदार संघटनेने याविरोधात संताप व्यक्त केला असून, बाहेरील ठेकेदारांना कोणत्याही परिस्थितीत येथे काम करू न देण्याचा निर्धार केला आहे. स्थानिक ठेकेदारांनी आपसातील मतभेद आणि राजकीय मतं बाजूला ठेवून एकत्र आला नाहीत, तर शहरांत गावात जसे रस्ते परप्रांतीयांनी व्यापले आहेत तसेच हे बाहेरील ठेकेदार एक दिवस आपल्याला या व्यवसायातून बाहेर फेकतील हे नक्की लक्षात असू द्या, असे स्पष्ट मत संघटनेचे सचिव उदय पाटील यांनी व्यक्त केले.

Exit mobile version