पाणीपुरवठा योजनेला ठेकेदाराचा चुना

1 कोटी 68 लाखांची योजना पाण्यात | जेएनपीटी | वार्ताहर | बांधपाडा ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील जनतेला करण्यात येणार्‍या पाणी पुरवठा योजनेचे काम हे ओम साई कन्स्ट्रक्शनचे ठेकेदार रवींद्र नाखवा यांच्याकडून चार वर्षांच्या कालावधीनंतरही पूर्ण होत नसेल, तर संबंधित ठेकेदाराची मालमत्ता जप्त करण्यात यावी आणि उर्वरित पाणी पुरवठा योजनेचे काम मार्गी लावण्यासाठी राजिप ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता श्री. वेंगुर्लेकर तसेच उरण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी एन.एन. गाडे यांनी लक्ष घालून पाणीपुरवठा योजनेचे काम मार्गी लावण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आदेश तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिले.  उरण तालुक्यातील बांधपाडा ग्रुप ग्रामपंचायत खोपटे गावासाठी सन 2015-16 या आर्थिक वर्षात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत अंदाचे 1 कोटी 92 लाखांच्या योजनेचे काम ओम साई कन्स्ट्रक्शनचे ठेकेदार रवींद्र नाखवा यांनी हाती घेतले होते. परंतु, 4 वर्षांचा कालावधी लोटत आल्यानंतरही पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम पूर्ण न करता संबंधित ठेकेदारानी 1 कोटी 68 लाख रुपयांचे बिल सन 2018 ला शासकीय अधिकारी वर्गाला हाताशी पकडून काढले, असे गावकर्‍यांचे म्हणणे आहे. बिल काढल्यानंतरही पाईप लाईनचे काम आजतागायत पूर्ण झाले नाही. यासंदर्भात मनसेच्या माध्यमातून गेल्या वर्षभरापासून सातत्याने मनसेचे उपतालुकाध्यक्ष सत्यवान भगत यांनी शासकीय कार्यालयात पत्रव्यवहार करून पाणीपुरवठा योजनेची चौकशी करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल उरणचे तहसीलदार भाऊ साहेब अंधारे यांनी घेऊन संबंधित ठेकेदारांची मालमत्ता जप्त करून कारवाई करा आणि सदर पाणीपुरवठा योजनेच्या पाईप लाईनचा अहवाल लवकरच सादर करण्यात यावा, असे आदेश दिले.

Exit mobile version