| पाली | प्रतिनिधी |
राज्यातील विविध विकासकामांकरिता दिलेल्या कंत्राटांपैकी सुमारे 89 हजार कोटी रुपयांची थकबाकी शासनाकडून अजूनही दिलेली नाही. याविरोधात महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व रायगड कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन यांच्यावतीने मंगळवारी (दि.19) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील शेकडो ठेकेदारांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात कंत्राटदारांनी, विभागनिहाय थकबाकीचे विवरण दिले असून, सार्वजनिक बांधकाम विभागावर 40 हजार कोटी, जलजीवन मिशनवर 12 हजार कोटी, ग्रामविकास विभागावर 6 हजार कोटी, जलसंधारण व जलसंपदा विभागावर 13 हजार कोटी, तर नगरविकास विभागांतर्गत डीपीसी व इतर कामांवर 18 हजार कोटी रुपयांची थकबाकी असल्याचा दावा करण्यात आला आहे. या आर्थिक अडचणीमुळे सांगलीच्या हर्षल पाटील या ठेकेदाराने आत्महत्या केल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ठेकेदारांची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली असून, सरकारने तत्काळ सकारात्मक पाऊल उचलावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. सरकारने लवकरात लवकर थकबाकीचा प्रश्न मार्गी लावला नाही, तर येत्या 25 ऑगस्टला जिल्ह्यात ‘भीक मागो’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रायगडचे विभागीय अध्यक्ष प्रकाश पालरेचा यांनी यावेळी दिला आहे.






