देशाच्या जडणघडणीत बँकांचे योगदान- अपसुंदे

नाबार्ड, रायगड जिल्हा बँक यांच्यातर्फे आझादी का अमृतमहोत्सव कार्यक्रम

| अलिबाग | प्रतिनिधी|

भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे होत असताना या कार्यकाळात देशाच्या ग्रामीण आणि शहरी भागांना एकत्र जोडण्याचे महत्वाचे कार्य बँकांच्या सहकार्यामुळे झाले आहे. त्यामुळे देशातील बँकिंगमध्ये कार्यरत असलेल्याने आपणही देशसेवेचा एक महत्वाचा भाग असल्याचा अभिमान बाळगणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक प्रदीप अपसुंदे यांनी सोमवारी (दि.7) केले.

नाबार्ड आणि रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या आझादी का अमृतमहोत्सव या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक,मुख्य व्यवस्थापक मंगेश ठाकूर, महेंद्र माळी, अजित भगत, बँकेचे विभागीय अधिकारी भरत पाटील, संजीव देशमुख हे व्यासपीठावर उपस्थित होते. नाबार्डच्या स्थापनेमागे असलेला ग्रामीण भारताच्या विकासाचा प्रयत्न नाबार्डच्या वतीने सदैव करण्यात आलेला असून नाबार्डचा प्रत्येक कार्यक्रम आणि योजना ही देशातील नागरिकांना सदैव उपयुक्त ठरलेली आहे असेही मत यावेळी प्रदीप अपसुंदे यांनी व्यक्त केले.

देशातील सहकारी संस्थांना अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी केंद्र सरकारच्या योजनांची अमलबजावणी तात्काळ करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. नाबार्डच्या विविध योजना आणि देशामध्ये त्याची असणारी व्याप्ती याबाबत देखील माहिती होणे गरजेचे आहे.

प्रदीप अपसुंदे, नाबार्ड व्यवस्थापक

यावेळी रायगड जिल्हा सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना देशाला स्वातंत्र्य मिळवून देण़ाऱ्या प्रत्येकाचा अभिमान बाळगत असताना भारताच्या या 75 वर्षाच्या प्रवासात ज्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले आहे त्यांचेही ऋण व्यक्त केले. तसेच सहकार चळवळ बळकट होण्यासाठी केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाचे देखील आभार मानले . रायगड जिल्हा सहकारी बँकेच्या इतिहासात संगणकीकरण, संस्थाचे एकत्रीकरण, देशातील पहिले किसान डेबिट कार्ड, महिला व्यवसायिकांना उभारी देण्यासाठी बचतगट चळवळ, सहकारी संस्थाचे संगणकीकरण, छोट्या व्यावसायिकांना तत्काळ कर्जसुविधा यामुळे रायगड जिल्हा सहकारी बँकेने आपल्या प्रवासात अनेकांना उभारी देण्याचे कार्य केले, पण केवळ इथेच न थांबता बँकेचे चेअरमन आ.जयंत पाटील, संचालक मंडळ यांनी तयार केलेल्या सर्वव्यापक आणि सर्वसमावेशक धोरणाला पुढे नेणे, जिल्ह्यातील ग्राहकांनी बँकेवर दाखविलेला विश्वास अधिक वृद्धीगंत करणे हे जबाबदार बँकर म्हणून आपले कर्तव्य असेल असेही मंदार वर्तक यांनी उपस्थित सहकारी कर्मचारी यांना आवाहन केले.

देशाच्या 75 वर्षाच्या इतिहासात बँकिंग जगताने देशाच्या धोरणात्मक विकास साधताना आपले भरीव योगदान दिले आहे, पण केवळ इथेच न थांबता बँकिंगमध्ये कार्यरत असलेल्या प्रत्येकाने आधुनिक प्रणालींचा स्वीकार तर करायचा आहेच पण त्याजोडीला आज जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये असलेल्या नागरिकांना बँकिंग प्रवाहामध्ये आणणे ही आमची सामूहिक जबाबदारी राहील असे वर्तक यांनी उपस्थितांना आश्वासित केले. यावेळी जिल्हा बँकेचे बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ व्यवस्थापक संदीप जगे तर आभार प्रदर्शन बँकेचे विभागीय अधिकारी संजय देशमुख यांनी केले.

Exit mobile version