पोलादपुरात डिजिटलायझेशनमुळे वादावादी

नगर भूमापन आणि सातबारा दुहेरी यंत्रणांचा घोळ ; सातबारा एकाच्या, तर मिळकत दुसऱ्याच्याच नावावर

| पोलादपूर | प्रतिनिधी |

तालुक्यामध्ये तसेच रायगड जिल्ह्यामध्ये भूमिअभिलेख विभाग आणि महसुली सातबारा उतारा दुहेरी यंत्रणांमध्ये घोळ मोठ्या प्रमाणात दिसून येत असून, भविष्यात यामध्ये अधिकच वादावादी घडून येण्याची शक्यता डिजिटलायझेशनमुळे निर्माण झाली आहे.

गावठाणालगतच्या जमिनींच्या बिनशेती सातबारा उताऱ्यांना गावठाणाचा दर्जा देण्याच्या अथवा मिळकतपत्र देण्याच्या भूमिकेतून सातबारा एका कुटुंबाच्या नावावर आणि मिळकतपत्र भलत्याच्याच नावावर असे घोळ झालेले दिसून येत आहेत. पोलादपूर शहरातील 1932 पासूनच्या सातबारा उताऱ्यावरील जमिनींची वासलात वेळोवेळी पोलादपूर तालुक्यात आलेल्या महसूल आणि भूमिअभिलेख अधिकाऱ्यांनीच लावलेली दिसून येत असल्याने केवळ सातबारा आणि आठ अ हाती बाळगण्याखेरीज सातबाराधारकाच्या वारसांकडे काहीच उरणार नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

यासोबतच पूर्वीची भूमिअभिलेखमधील हाताने लिहून दिलेली मिळकतपत्रे आणि आता डिजिटल मिळकतपत्रे यांच्यातील मालमत्तेच्या धारणा पद्धतीचा उल्लेख बदलेला दिसून येत आहे. ड्रोन पद्धतीने मोजणी करण्यामुळे प्रत्यक्ष मोजमापापेक्षा अधिक जमिनीचे क्षेत्र लगतच्या मोजणी करणाऱ्यांच्या नकाशामध्ये समाविष्ट होत आहे. हे वाद प्रथम भूमिअभिलेख उपअधीक्षक अधिकारी त्यानंतर जिल्हा अधीक्षक अधिकारी भूमिअभिलेख यांच्या न्यायालयामध्ये जात असल्याने भविष्यात मालमत्ताधारक पोलादपूरकरांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागणार आहे, तर मालमत्तेवर अतिक्रमण करणाऱ्यांना जमिनीची लॉटरीच लागणार आहे.

एकीकडे पोलादपूर शहरातील विस्तारित गावठाणातील वाद भूमिअभिलेख उपअधीक्षक कार्यालयाने निस्तरले नसून, कोणीही जबाबदार सक्षम अधिकारी याठिकाणी पूर्णवेळ काम करताना आढळून येत नाहीत, तर दुसरीकडे या कार्यालयाकडून पूर्वीपासून करण्यात आलेले घोळ निस्तरण्याची मानसिकता न दाखविता जिल्हा भूमिअभिलेख अधीक्षक अधिकारी यांच्याकडे ज्याची जमीन दुसऱ्याने हडपली अशा पीडित व्यक्तीस पाठविण्याचे पत्र देऊन न्यायालयाच्या चकरा मारण्यात तो दमून जाईल, अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे.

Exit mobile version