समाजसेवक प्रशांत रणवरे यांचा तीव्र विरोध
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
कळंबोली रोडपाली परिसरातील मैदानावर येथील 25 एप्रिल रोजी ‘रॉयल स्टॅग बूम’ या नावाने लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमावरून वाद निर्माण होण्याची शक्यता असून, समाजसेवक प्रशांत रणवरे यांनी या कार्यक्रमाला तीव्र विरोध दर्शविला आहे.
मद्य प्रायोजित या कार्यक्रमामुळे शहरातील तरुणांवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करत त्यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याकडे या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्याची मागणी केली आहे. प्रशांत रणवरे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, अशा प्रकारच्या मोठ्या कॉन्सर्टमधून नशेला अप्रत्यक्ष प्रोत्साहन मिळते आणि त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. अलीकडेच मुंबईतील नेस्को सेंटर येथे झालेल्या एका कार्यक्रमात अमली पदार्थांच्या सेवनामुळे दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याचे त्यांनी नमूद केले. या घटनेनंतर अशा कार्यक्रमांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. तसेच, खारघर येथे पार पडलेल्या एका आंतरराष्ट्रीय कॉन्सर्टमध्ये कलाकारांकडून नशेला प्रोत्साहन देणारी विधाने करण्यात आल्याचा आरोपही रणवरे यांनी केला. या पार्श्वभूमीवर कळंबोलीतील प्रस्तावित कार्यक्रमाबाबत प्रशासनाने अधिक सतर्कता बाळगणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यात ‘नशामुक्त महाराष्ट्र’ मोहिम राबविण्यात येत असताना अशा मद्य प्रायोजित कार्यक्रमांमुळे या मोहिमेला धक्का बसण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. तरुण पिढीमध्ये चुकीचे संदेश जाऊ नयेत, यासाठी प्रशासनाने जबाबदारीने निर्णय घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमामुळे तरुणांमध्ये नशेचे आकर्षण वाढण्याची, अमली पदार्थांच्या वापरास चालना मिळण्याची तसेच शहराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचे रणवरे यांनी नमूद केले. त्यामुळे नवी मुंबईची सुरक्षित आणि सुसंस्कृत शहर म्हणून असलेली ओळख कायम राखण्यासाठी अशा कार्यक्रमांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. सध्या याप्रकरणी पोलीस प्रशासनाकडून अधिकृत भूमिका जाहीर होण्याची प्रतीक्षा असून नागरिकांचे लक्ष याकडे लागले आहे.
खासदार बारणे यांचं आश्वासन
याप्रकरणी मावळचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांनी लक्ष घालावे याकरिता समाजसेवक रणवरे यांनी खासदार बारणे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, या प्रकारावर लक्ष घालणार असल्याचे आश्वासन खा. बारणे यांनी दिल्याची माहिती रणवरे यांनी दिली आहे.
