उद्योगमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्याने रंगली चर्चा
| अलिबाग | वार्ताहर |
रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद अद्यापही सुटलेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांची नियुक्ती जाहीर केली होती. मात्र, शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला. त्यांच्या समर्थकांनी रास्ता रोको आणि काही ठिकाणी जाळपोळ केली. वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर तटकरे यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली. आता उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या वक्तव्याने हा वाद पुन्हा चर्चेत आला आहे. सामंत यांनी गौप्यस्फोट करत सांगितले की, तिन्ही पक्षांच्या सहमतीने भरत गोगावले यांना पालकमंत्री करण्याचे आधीच ठरले होते. भरत गोगावले स्वतःही या पदासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे महायुतीत यावरून नवीन वाद होण्याची शक्यता आहे.
दापोलीतील एका कार्यक्रमात बोलताना उदय सामंत यांनी, “मी अडीच वर्षे रायगडचा पालकमंत्री होतो. भरतशेठ गोगावले मंत्री नसल्याने ती जबाबदारी माझ्यावर होती. मात्र, ते निवडून आल्यावर तेच पालकमंत्री होतील, असा निर्णय घेतला होता,’’ असे स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील संघर्षामुळे हा वाद लवकर मिटण्याची चिन्हे नाहीत. रायगड पालकमंत्रिपदाचा मुद्दा अजूनही अनिर्णित राहिल्याने जिल्ह्यात राजकीय अस्थिरता कायम आहे.