। अलिबाग । प्रतिनिधी ।
स्तनदा मातांसाठी स्वतंत्र हिरकणी कक्ष उभारून या शासकीय धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सुचना रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले होते. मात्र, एसटी महामंडळ रायगड विभागामार्फत त्याची चोख अंमलबजाणी होत नसल्याचे चित्र समोर आले आहे. अनेक स्थानकांमध्ये या हिरकणी कक्षात सोयी सुविधा नसल्याच्या तक्रारी निर्माण झाल्या आहेत. एसटी महामंडळाच्या या कारभाराबाबत अनेकांकडून नाराजीचे सुर उमटत आहे.
स्तनदा मातांसाठी स्वतंत्र हिरकणी कक्षाची सुविधा असावी, या शासकीय धोरणाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. ज्या शासकीय इमारतीत अद्याप हिरकणी कक्ष सुरू करण्यात आलेला नाही. त्या ठिकाणी हिरकणी कक्ष तात्काळ स्थापन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी फेब्रुवारी महिन्यात एका बैठकीमध्ये दिल्या होत्या. शासकीय कार्यालये आणि सर्वच महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष उभारावेत. यात स्वतंत्र खोली असावी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पलंग-गादी, चांगले बेडशीट, उशा, पंखा असावा, हिरकणी कक्षाच्या भिंतीवर स्तनपानाचे महत्त्व आणि शिशुपोषणाच्या शिफारशी, सचित्र माहिती असावी. त्यानुसार जिल्ह्यातील विविध कार्यालयात हिरकणी कक्ष कार्यान्वित करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिल्या होत्या. मात्र, अलिबागसह जिल्ह्यातील अनेक एसटी बस स्थानकात या हिरकणी कक्षांची अवस्था दयनीय असल्याचे चित्र समोर आले आहे. हिरकणी कक्षाच्या नावाने उभारलेल्या जागेमध्ये नियंत्रण कक्ष उभारण्यात आले असून, त्याच ठिकाणी एका लहान खोलीमध्ये हिरकणी कक्ष केले आहे. मात्र, तेथील पंखा चालू- बंद या अवस्थेत असून, तेथील कक्षाच्या भिंतीवर कोणत्याही प्रकारची सचित्र माहितीदेखील नसल्याचे समोर आले आहे.
रायगड महामंडळाचे दुर्लक्ष
एसटी महामंडळ रायगड विभागाच्या अखत्यारित आठ एसटी बस आगार येतात. 19 बस स्थानकांचा समावेश आहे. एसटीतून दिवसाला हजारो प्रवासी प्रवास करतात. त्यात महिला प्रवाशांची संख्या अधिक आहे. मात्र, हिरकणी कक्ष अद्ययावत नसल्याने त्या ठिकाणी स्तनदा मातांची पाठ असल्याचे दिसून आले आहे. जिल्हाधिकारी यांच्या अंमलबजावणीच्या आदेशाकडे एसटी महामंडळ रायगड विभागाने दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यातील एसटी बस स्थानकात हिरकणी कक्ष सोयी सुविधांयुक्त उभारण्याबाबत सुचना करण्यात आल्या आहेत. सर्व स्थानकातील हिरकणी कक्षाची माहिती घेऊन पुढील कार्यवाही करण्याच्या सुचना केल्या जातील.
दिपक घोडे,
विभाग नियंत्रक, रायगड, एसटी महामंडळ