रक्तपेढी स्थलांतरीत करण्यासाठी इमारतीचे काम लांबणीवर जाण्याची शक्यता
। अलिबाग । प्रमोद जाधव |
अलिबागमध्ये 300 खाटांचे नवीन रुग्णालय उभारण्यात येणार आहे. वीस दिवसांपूर्वी या इमारतीच्या बांधकामाचे भूमीपूजन मोठ्या थाटामाटात करण्यात आले. इमारतीचे प्रत्यक्ष काम तातडीने सुरू होण्याची अपेक्षा होती. मात्र, ही अपेक्षा भंग होण्याचे चित्र समोर आले आहे. नव्याने बांधण्यात येणार्या जागेत असलेली रक्तपेढी हटविणे आवश्यक आहे. मात्र, त्यासाठी लागणारा निधी आणि मंजुरी लालफितीत अडकून असल्याने नव्या रुग्णालयाचे काम लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.
अलिबागमध्ये गेल्या 45 वर्षांपूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत बांधण्यात आली. 200 खाटांचे असलेल्या ही इमारत जीर्ण झाली आहे. करोडो रुपये खर्च करून सध्या जुन्या इमारतीची दुरुस्ती करण्यात आली आहे. दुरूस्ती करूनही इमारतीची पडझड अद्यापही सुरूच आहे. ही इमारत जीर्ण झाल्याने रुग्णांसह कर्मचार्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नवीन रुग्णालयाच्या इमारतीची प्रतीक्षा रायगडकारांना लागून राहिली होती. अखेर या इमारतीच्या बांधकामाच्या भूमीपूजनाला मुहूर्त लागला. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते अलिबागमध्ये बुधवारी दि.5 मार्च 2025 रोजी सायंकाळी नवीन रुग्णालयाच्या इमारतीचे भूमीपूजन झाले.
सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत अलिबागमध्ये 300 खाटांची क्षमता असणारी अद्ययावत आंतररुग्ण इमारत उभारण्यात येणार आहे. मुंबई येथील अजवानी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. या कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. तळमजल्यापासून सात मजली ही इमारत असणार आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी 105 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता आहे. या इमारतीच्या जोथ्याचे क्षेत्रफळ दोन हजार 250 चौ.मी. इतके असून, एकूण बांधकाम 17 हजार 800 चौ. मी. इतक्या क्षेत्रफळात केले जाणार आहे.
नोंदणी कक्ष, ब्लड बँक, शस्त्रक्रिया सेंटर, अपघात विभाग, अतिदक्षता विभाग, डायलिसिस सेंटर, प्रशासकीय कार्यालय आदी सुविधा असणार आहे. या नवीन आंतररुग्ण इमारतीचा भूमीपूजन सोहळा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि. 5) झाला. भूमीपूजन होऊन 20 दिवस झाले आहेत. मात्र, अद्यापपर्यंत या इमारतीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत माहिती घेतली असता, नव्याने बांधण्यात येणार्या जागेत रक्तपेढीची इमारत आहे. ही रक्तपेढी अन्य ठिकाणी स्थलांतरीत करणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून सुमारे 68 लाख रुपयांचा निधी जिल्हा रुग्णालयाने मंजूर करून घेतला आहे.
रुग्णालयाच्या लहान मुलांच्या कक्षात रक्तपेढी असणार आहे. त्यामुळे नव्याने रक्तपेढीचे कार्यालय उभारण्यासाठी साधनसुविधा उपलब्ध करण्यासाठी मान्यता मिळविणे गरजेचे आहे. ही मान्यता अद्याप मिळाली नाही. त्यामुळे हे प्रत्यक्ष नव्या रुग्णालयाच्या इमारतीचे काम लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.
रक्तपेढी हालविण्यासाठी दोन महिने गेल्यास नंतर जून महिना सुरु होणार आहे. त्यामुळे नव्या रुग्णालयाच्या इमारतीच्या प्रत्यक्ष कामाला डिसेंबरअखेरच सुरुवात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दीड ते दोन वर्षात या इमारतीचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा लांबणीवर जाण्याची शक्यता अनेकांकडून वर्तविली जात आहे.
रुग्णालयाला सीआरझेडची आडकाठी
अलिबागमध्ये नव्याने जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत बांधली जाणार आहे. ही इमारत समुद्र किनारपट्टीनजीक असल्याने इमारतीची जागा सीआरझेडमध्ये येते. त्याची मान्यता घेण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या रुग्णालयाला सीआरझेडची आडकाठी आली आहे. संबंधित विभागाकडून मान्यता मिळाल्यावर हे काम सुरू होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे. उसर येथे नव्याने बांधण्यात येणार्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे भूमीपूजनदेखील घाईत व थाटात केले. परंतु, भूमीपूजनाला पाच वर्षे होत आली, तरीदेखील प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात झाली नसल्याचे चित्र आहे. त्यापद्धतीने जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीच्या कामाची अवस्था होणार नाही, ना असा सवाल जनमानसातून निर्माण झाला आहे.
सीआरझेड विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. संबंधित विभागाकडून लवकरच मान्यता मिळणार आहे. तसेच या जागेत रक्तपेढी आहे. ती अन्य ठिकाणी हटविण्याचे कामदेखील केले जाणार आहे. त्यानंतर कामाला सुरुवात होईल.
राजू डोंगरे,
उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अलिबाग
नवीन रुग्णालयाचे ज्या जागेत बांधकाम होणार आहे. त्याठिकाणी असलेली रक्तपेढी हटविण्याचे काम केले जाणार आहे. त्यासाठी लागणारा निधी मंजूर झाला आहे. मान्यता मिळाल्यावर तातडीने रक्तपेढी हालविण्याचे काम केले जाईल.
डॉ. निशीकांत पाटील,
जिल्हा शल्यचिकित्सक