विक्रेत्यांना सुविधा, नागरिकांना दिलासा; अलिबागमध्ये भाजी मंडई-मासळी मार्केटच्या कामाला वेग

४० लाखांची भाजी मंडई, एक कोटींचे मासळी मार्केट; वीज व बांधकाम समिती सभापती प्रशांत नाईक, उपनगराध्यक्ष ॲड. मानसी म्हात्रे यांच्याकडून कामाची पाहणी

अलिबाग :शहरातील भाजी व मासळी विक्रेत्यांसह नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अलिबाग नगर परिषदेच्या माध्यमातून भाजी मंडई आणि मासळी मार्केट उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नियोजनबद्ध, स्वच्छ आणि सुविधायुक्त बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या या दोन्ही प्रकल्पांमुळे आगामी काळात विक्रेते तसेच नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

भाजी मंडईच्या उभारणीसाठी सुमारे ४० लाख रुपये, तर मासळी मार्केटसाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. दोन्ही इमारतींचे काम चांगल्या सुविधा आणि नागरिकांच्या सोयी लक्षात घेऊन करण्यात येत असून, बाजारपेठ अधिक व्यवस्थित करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे.

वीज व बांधकाम समितीचे सभापती प्रशांत नाईक आणि उपनगराध्यक्ष ॲड. मानसी म्हात्रे यांनी सुरू असलेल्या भाजी मंडई आणि मासळी मार्केटच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी कामाची सद्यस्थिती, बांधकामाची प्रगती तसेच विक्रेते आणि नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांबाबत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली.

“विक्रेत्यांना चांगली आणि सुविधायुक्त जागा मिळावी, तसेच नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि व्यवस्थित बाजारपेठ उपलब्ध व्हावी, हा या प्रकल्पामागील मुख्य उद्देश आहे. काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून नागरिकांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यावर भर आहे,” असे प्रशांत नाईक यांनी यावेळी सांगितले.

भाजी आणि मासळी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र व नियोजनबद्ध जागा उपलब्ध झाल्याने बाजारपेठेतील व्यवस्थापन अधिक सुटसुटीत होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर नागरिकांना खरेदी करताना अधिक चांगले आणि सुरक्षित वातावरण मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे दोन्ही प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अलिबागच्या बाजारव्यवस्थेला अधिक शिस्तबद्ध आणि आधुनिक स्वरूप मिळणार आहे.

या प्रसंगी नगरसेवक ॲड. ऋषिकेश माळी, अश्विनी ठोसर, नीलम हजारे, निवेदिता वाघमारे, योजना पाटील, जमाल सय्यद तसेच नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version