। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
नवी मुंबईतील सारसोले गाव सेक्टर 6 मधील महादू रंग्या पाटील मासळी मार्केटची जागा अपुरी असून मोडकळीस आलेल्या स्थितीत आहे. त्यामुळे स्थानिक मच्छिमार विक्रेते बाहेर रस्त्यावर उघड्यावर मासळी विक्री करत आहेत. याचा त्रास स्थानिक रहिवाशांना तसेच पादचार्यांना होत आहे. सदर मासळी मार्केटचे नूतनीकरणाची मागणी प्रल्हाद पाटील यांनी नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
हे मासळी मार्केट सारसोले गाव आणि गावठाण परिसर याच्या मधील मुख्य रस्त्यावर आहे. या ठिकाणच्या रस्त्यावर भाजीपाला तसेच अन्य दुकाने असल्याने नागरिकांची इथं सतत वर्दळ असते. सदर मासळी मार्केटला सुमारे 20 वर्षी झाली असून आजमितीला ते मोडकळीस अवस्थेत झाले आहे.सदर मासळी मार्केटची अवस्था दयनीय झाली आहे. मागील 5 वर्षात कोणत्याही प्रकारची डागडुजी झाली नाही.तसेच प्राथमिक सुविधा मार्केट मध्ये उपलब्ध नाही. मार्केटचा पश्चिमेकडील भाग धोकादायक झाला आहे.