। पनवेल । प्रतिनिधी ।
सुरीचा धाक दाखवून तरुणाच्या गळ्यातील सुमारे 1 लाख रुपये किमतीची सोन्याची चेन चौघा लुटारूंनी जबरदस्तीने लुटून नेली. ही घटना नवी मुंबई विमानतळासमोरील उलवे-चिंचपाडा मार्गावर घडली. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी अज्ञात चौघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
या प्रकरणातील तक्रारदार धीरज विलास मुंडे (24) हा पनवेल येथे राहत असून तो सीवूड्स येथील क्रोमा शोरूममध्ये काम करतो. कामावरून सुटल्यानंतर धीरज दुचाकीवरून विमानतळासमोरील रस्त्याने पनवेलकडे घरी जात होता. वाधिवली प्रवेशद्वाराजवळ मोटारसायकलवरून आलेल्या चौघांनी विमानतळाचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने धीरजला रस्त्यात अडवले. तो काही बोलण्यापूर्वीच त्यातील एका लुटारूने सुरीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर चौघांनी धीरजच्या गळ्यातील 15 ग्रॅम वजनाची सुमारे 1 लाख रुपये किमतीची सोन्याची चेन जबरदस्तीने काढून घेतली. लूट केल्यानंतर चौघेही दुचाकीवरून उलवेच्या दिशेने पसार झाले. या घटनेनंतर धीरज मुंडे याने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, आरोपींची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्यासाठी तपास सुरू आहे.







