। पनवेल । प्रतिनिधी ।
गव्हाण फाटा येथील वाहतूक पोलीस चौकीजवळ महिलेची हत्या करून तिचा मृतदेह खड्ड्यात पुरून ठेवला होता. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सुशील हिरेन आणि त्याचा मित्र रमेश तमस एक्का अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
गव्हाण फाटा येथील वाहतूक पोलीस चौकीजवळ एका महिलेचा मृतदेह नाल्यात पुरून ठेवल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढून ताब्यात घेतला.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, मृत महिलेच्या पतीनेच मित्राच्या मदतीने तिची हत्या केल्याचे समोर आले आहे. सुशील हिरेन हा गव्हाण फाटा येथील वाहतूक कार्यालयासमोरील पुलाखाली राहत असून, तो भंगार गोळा करण्याचे काम करतो. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत त्याने मित्र रमेश तमस एक्का याच्या मदतीने तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत तिचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
हत्येनंतर मृतदेह खड्ड्यात पुरून ठेवण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून, हत्येचे नेमके कारण आणि अन्य बाबींचा अधिक तपास सुरू आहे.






