। रोहा । प्रतिनिधी ।
रोहा शहरात सद्या मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. या भटक्या कुत्र्यांविषयी उपाय योजना करावी, अशी मागणी जनतेतून होत असताना नगर पालिकेने या मोकाट कुत्र्यांची धडपकड मोहीम सुरू केली आहे. यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
रोहा शहर व ग्रामीण भागातील अनेक गावात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात शेकडो जण जखमी झाले आहेत. या भटक्या कुत्र्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने नागरिकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. गणेशोत्सवात चाकरमानी आपल्या गावी येत असल्याने सणासुदीत कुत्र्यांच्या हल्ल्यांचे घटना घडू नये म्हणून नगर पालिका प्रशासनाने तातडीने या संदर्भात उपाय योजना करावी, अशी मागणी जनतेकडून होत होती. मागणीनुसार नगराध्यक्षा वनश्री शेडगे, मुख्याधिकारी अजय कुमार एडके, उपाध्यक्ष अहमद दर्जी व सर्व सभापती यांच्या प्रयत्नाने रोहा नगर पालिका हद्दीत शुक्रवारी (दि.18) भटक्या कुत्र्यांची धडपकड मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेत अनेक भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर निर्भिजीकरण व लसीकरण करण्यात आली, अशी माहिती नगर पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे घाबरलेल्या रोहेकरांना आता मात्र दिलासा मिळाला आहे.






