। उल्हासनगर । प्रतिनिधी ।
उल्हासनगर शहरात केरला फाईल या हिंदी चित्रपटात घडलेल्या कथेप्रमाणे काहीसा प्रकार समोर आला आहे. एका कुटुंबाने त्यांच्या मुलीने मुस्लीम धर्म स्वीकारल्याने आणि तिचा गैरवापर होत असल्याच्या संशयावरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मुंबईलगतच्या ठाण्यातल्या उल्हासनगरमधील तरुणी 2022 पर्यंत दृष्टी चौधरी होती. मात्र आता ती आयेशा सिद्दीकी झाली आहे. तिला फूस लावून तिचं धर्मांतर करण्यात आल्याचा तिच्या आईचा आरोप आहे. आईनं केलेल्या पाठपुराव्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. आयेशा सिद्दीकी म्हणजेच धर्मांतरापूर्वीची दृष्टी चौधरी, तिचे साथीदार सलीम चौधरी आणि काझी इलियास निझामीविरोधात गुन्हा दाखल झालाय. सध्या हे जामिनावर बाहेर आहेत. या प्रकरणाचा तपास दहशतवादी विरोधी पथकाकडे सोपवण्यात आलाय. कारण दृष्टीकडून मलेशियाला फरार झालेला झाकीर नाईकच्या भाषणाच्या सीडी सापडल्यात. तसंच मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यासंदर्भात काही नोट्स सापडल्यात.
जाकीर नाईक यांचे व्हिडीओ पाहून इस्लामचे शिक्षण
दृष्टी ही युट्युबवरील जाकीर नाईक यांचे व्हिडीओ पाहायची. दृष्टी आणि शबाना शेख या नितनवरे यांच्या घरी त्यांच्या मुली बरोबर अभ्यास करायला जायची. रात्री उशीरापर्यंत अभ्यास करून कधी कधी त्यांच्या घरी झोपायची, त्यावेळी शबाना शेख ही इस्लामचे शिक्षण देत होती, असे फिर्यादीमध्ये कल्पना चौधरी यांनी नमूद केले आहे. तसेच नितनवरे यांची मुलगी आणि दृष्टी हीचा बुरखा घातलेला फोटो इन्स्टाग्रामवर शेजारच्या एका बाईने दाखविला होता. त्यावर दृष्टीने बुरखा घातलेल्या फोटोबाबत विचारणा केली, त्यावर तिने सहजच तो फोटो काढलेला आहे असे सांगत दृष्टीने विषय उडवून लावला होता.