नागोठण्यात कूच बिहार ट्रॉफीचा शुभारंभ

क्रिकेटचा महासंग्राम बघायला तरुणांची गर्दी

| नागोठणे | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील रिलायन्स नागोठणे येथील क्रिकेट स्टेडियमच्या मैदानावर रविवारी (दि.16) महाराष्ट्र विरुद्ध ओडिशा कूच बिहार क्रिकेट स्पर्धेतील सामन्याला शुभारंभ करण्यात आला. कूच बिहार ट्रॉफी ही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाद्वारे(बीसीसीआय) तर्फे आयोजित केली जाणारी 19 वर्षांखालील खेळाडूंसाठीची एक महत्त्वाची राष्ट्रीय चार दिवसीय क्रिकेट स्पर्धा आहे.

रिलायन्स नागोठणे विभागाचे अध्यक्ष शशांक गोयल, परेश ठाकूर, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील सचिव प्रदीप नाईक, सामना अधिकारी विनीत विओला, रिलायन्सचे जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सामन्याला सुरवात करण्यात आली. यावेळी बीसीसीआयचे ज्येष्ठ व्हिडिओ विश्लेषक सदानंद प्रधान यांनी बीसीसीआयसाठी 18 वर्ष सेवा यशस्वी रित्या पूर्ण केल्या बद्दल त्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सामन्याचे सामना अधिकारी, पंच, गुणलेखक व सामना यशस्वी करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या प्रत्येक विभागाच्या लोकांचा सामना सुरू होण्यापूर्वी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कूच बिहार क्रिकेट स्पर्धेतील हा साखळी फेरीतील सामना असून, सामना दिनांक 16 ते 19 नोव्हेंबर असा चार दिवसीय असणार आहे. ह्या सामन्यासाठी रिलायन्स नागोठणे प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून सुसज्ज मैदान, सुरेख खेळपट्टी, खेळाडूंसाठी चांगल्या दर्जाचे पॅव्हेलियन व सुरक्षा व्यवस्था रिलायन्स कडून करण्यात आली आहे.

रिलायन्स कॉर्पोरेट सर्व्हिसेसचे प्रमुख पुनीत मिश्रा, हॉर्टिकल्चर विभागाचे प्रमुख शरद पवार, हॉर्टिकल्चर विभागाचे सदस्य शांताराम करंजे, सिव्हिल डिपार्टमेंटचे प्रतिनिधी इस्माईल पिट्टू, विद्युत विभागाचे प्रतिनिधी राशिद दापोलकर, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश पाटील, खजिनदार प्रशांत ओक, सहसचिव जयंत नाईक, सदस्य ॲड. पंकज पंडित, शंकर दळवी, सुयोग चौधरी, संदीप जोशी, रवी सोलंकी, डॉ. राजाराम हुलवान, मिलिंद मांढरे, रोहित कार्ले उपस्थित होते. कूच बिहार क्रिकेट स्पर्धेतील हा सामना पाहण्यासाठी सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व अकॅडमी व क्लबच्या खेळाडू व क्रिकेट प्रेमी लोकांनी सामना पाहण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील व सचिव प्रदीप नाईक यांनी केले आहे.

Exit mobile version