सहनियंत्र समितीच्या चुकीचा धोरणाचा अडथळा

ई-रिक्षा मोजेतेय अखेरची घटका

| कर्जत | प्रतिनिधी |

माथेरानला सर्वेाच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 5 डिसेंबर रोजी तीन महिन्यांच्या प्रायोगिक तत्त्वावर 5 मार्चपर्यंत ई-रिक्षा चालवण्यात आल्या. यावेळी सात रिक्षा असूनदेखील अविरत सेवा दिली. या तीन महिन्यांच्या कालावधीत न्यायालयात माथेरान सहनियंत्र समितीने ई-रिक्षाचा अहवाल सादर करणे अपेक्षित असताना तो सादर न केल्याने नगरपरिषदेचे खरेदी केलेल्या ई-रिक्षा योग्य देखभालीअभावी शेवटची घटका मोजत आहेत.

सध्या नगरपरिषदेच्या आवारात उभ्या असलेल्या ई-रिक्षाला भटक्या कुत्रांनी लक्ष केले असून, पावसाळ्यात भटक्या कुत्रांनी आपले ठाण मांडले आहे, तर रिक्षाचे सिट कव्हरदेखील फाडले आहेत. एकाच जागेवर उभ्या असलेल्या रिक्षाची बॅटरी उतरली असून, उंदिरांनी वायरिंग खाल्ले असल्याने अजून काही दिवस रिक्षा अशाच उभ्या राहिल्यास आणखीन नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नवीन घेतलेल्या रिक्षा नगरपालिकेला भंगारात विकण्याची वेळ येऊ शकते. तरी लवकरात लवकर सहनियंत्र समितीचे यावर निर्णय घेणे अपेक्षित आहे.

ई-रिक्षामुळे शालेय विद्यार्थ्यांची सोय होऊन ज्येष्ठ नागरिकांनादेखील उपयोग होत होता, तर दस्तुरीवरून दिव्यांग व्यक्तींना मोठ्या प्रमाणात रिक्षाचा फायदा होत होता. ई-रिक्षा बंद झाल्याने पुन्हा माथेरानमधील रिक्षा चालक हातरिक्षाकडे वळल्याने देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षांचा कालावधी लोटला तरी माथेरानमध्ये आजही ब्रिटिश कायद्याचे पालन होताना दिसत आहे. त्यामुळे माथेरानला स्वातंत्र्य मिळेल का, हा विषय संशोधनाचा आहे. प्रत्येक गोष्ट ही माथेरानमध्ये सहनियंत्र समिती ठरवत असल्याने नगरपरिषदेला कुठलेही अधिकार नाहीत, त्यामुळे वर्षानुवर्षे नागरिकांना मातीच्या रस्त्यावरून चालावे लागते. नुकत्याच माथेरान शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील या रस्त्यावरून चालताना दगडात पाय अडकून पडल्याने त्यांना मोठी दुखापत झाली. वेळेवर रूग्णवाहिका न मिळाल्याने त्यांच्या त्रासात आणखीनच भर पडली. मोठ्या जखमेमुळे त्यांना काही दिवस घरीच विश्रांती करावी लागली. ई रिक्षा असती तर वेळेवर उपचार मिळाले असते, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.

माथेरान नगरपालिकेत उभ्या असलेल्या ई-रिक्षांबाबत सहनियंत्र समितीने लवकर निर्णय घेऊन रिक्षा सुरू कराव्यात. आपण याकरिता जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांची भेट घेणार आहोत.

पूजा राजेश भोईटे, सामाजिक कार्यकर्त्या
Exit mobile version