। कर्जत । प्रतिनिधी ।
आदिवासी ठाकूर समाज संघटना कर्जत तालुक्याच्या वतीने 9 ऑगस्ट रोजी ‘जागतिक आदिवासी दिन’ मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येणार असून, कोतवाडी नेरळ येथून सुरुवात होणार आहे.
आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन या कार्यक्रमासाठी आदिवासी संघटनेतर्फे समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. अध्यक्षपदी, कांता पादिर यांची निवड करण्यात आली आहे. समितीमध्ये आदिवासी तालुका संघटनेचे पदाधिकारी आणि समन्वय समिती अध्यक्ष, कांता पादिर, उपाध्यक्ष अमर लांबे, सचिव उत्तम पारधी, खजिनदार नितीन गिरगुडे, सदस्य म्हणून अर्जुन केदारी, दिलीप पिंगळे, रंजन वाले, वाकु कुंकु, गोकुळ पवार, श्रीकांत धुंदे, खंडू काकडे, सुनील पारधी, भाऊ मेहांदळे, सुरेखा केदारी यांची निवड करण्यात आली आहे.
कार्यक्रमात कोणत्याही राजकीय नेत्यांना भाषण करण्यास परवानगी दिली जाणार नसून, हा पूर्णपणे समाजाच्या एकजुटीचा कार्यक्रम असेल, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. कोतवाडी येथे सकाळी 10 वाजता कार्यक्रम सुरू होणार असून, खंडस येथे स्टेज उभारण्यात येणार आहे. खंडस मार्गाने येणारी वाहने दोरेवाडी पर्यायी मार्गाने मुरबाड रोडकडे वळविण्यात येणार असून, कशेळे व दौरेवाडी मार्गांचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी पोलीस स्टेशनला लेखी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. कार्यक्रमात कातकरी व महादेव कोळी समाजातील बांधवांकडून पारंपरिक नृत्य सादर केले जाणार आहे. तसेच आपल्या जल, जंगल, जमीन व संस्कृती जपण्याचा संदेश दिला जाणार आहे.







