खासदारकीच्या तिकिटासाठी ‌‘समन्वय’ ?

दिल्लीत जाण्यास इच्छुक नेते असणार मंचावर ; तिकिटाच्या मुद्द्यावर शिंदे गटाचे नेते घेणार असुरी आनंद

| रायगड | प्रतिनिधी |

रायगड लोकसभा मतदारसंघामधून निवडून येणारा खासदार मोदींना समर्थन देणारा असावा यासाठी भारतीय जनता पार्टीने राजकीय डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे. खासदारकीचे तिकीट भाजपाला की राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी तिकीट आम्हालाच मिळणार अशी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. भाजपच्या मेळाव्यांमधून सुनील तटकरे नको, तर राष्ट्रवादीच्या बैठकांमध्ये भाजप नको, असा सूर आळवला जात आहे. रविवारी शिवसेना, भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादी गट यांचा समन्वय मेळावा अलिबाग येथे संपन्न होणार आहे. या मेळाव्यात गर्दी जमविण्याचे नियोजन आठवडाभरापासून सुरु झाले आहे. व्यासपीठावर दिल्लीत जाण्यासाठी इच्छुक असणारे नेते उपस्थित असणार आहेत.

दरम्यान, मेळाव्यातून खासदाराचे तिकीट कोणाला याचा ढोबळ अंदाज लावण्याची संधी रायगडकरांना असणार आहे. कारण, याच मंचावर इच्छुक उमेदवार आपल्या भाषणातून आपली मते स्पष्ट करतील आणि यातूनच खासदारकीच्या तिकिटाचा समन्वय साधला जाणार असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तयारीला इंडिया आघाडी आणि भाजप प्रणित महायुती लागल्याचे चित्र रायगडात पहावयास मिळत आहे. रायगडचा खासदार कोण म्हणण्यापेक्षा कोणत्या राजकीय पक्षाला खासदारकीची तिकीट मिळणार याकडे रायगडकरांचे लक्ष लागले आहे. खासदारकीसाठी भाजपचे धैर्यशील पाटील, तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे विद्यमान खासदार सुनील तटकरे दोघेही दिल्लीत जाण्यासाठी इच्छुक आहेत. आपल्याला तिकीट मिळावे म्हणून दोन्ही नेत्यांनी पक्षश्रेष्ठींसमोर आपापली ताकद दाखविण्यास सुरुवात केली आहे. कार्यकर्त्यांच्या तोंडीदेखील आपल्याच नावाचा जप करण्याचा मंत्र दिला असल्याचे रायगड जिल्ह्यात होणाऱ्या आपापल्या पक्षांच्या बैठका आणि मेळाव्यांमधून पहावयास मिळत आहे.

नुकताच माणगाव आणि अलिबाग येथे झालेल्या भाजपच्या मेळाव्यांमधून खासदारकीचा सुनील तटकरे नको तर भाजपचे धैर्यशील पाटील उमेदवार असावेत, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. नेत्यांनीदेखील भाजपासाठी रायगड लोकसभा निवडणूक सुनील तटकरेंना कशी जड जाईल याचा पाढा वाचला. भाजपच्या मेळाव्यानंतर विद्यमान खासदार सुनील तटकरे यांनी भाजपच्या मेळाव्यातील विधानांचा समाचार घेत लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपाबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होणार आहे, असे सांगून वेळ मारून नेली आहे.

रविवारी संध्याकाळी अलिबाग येथे समन्वय मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात खासदरकीच्या तिकिटवरून गोंधळ उडण्याची शक्यता आहे. मेळाव्याचे अध्यक्षस्थान कोण भूषविणार आणि प्रास्ताविक कोणता नेता करणार याकडे रायगडकरांचे लक्ष लागले आहे. याच मेळाव्यात आमच्या नेत्याला खासदारकीचे तिकीट हवे, अशी मागणी करणारे भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर असणार आहेत. या मेळाव्यात शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि नेते समन्वयकाची भूमिका बजावणार असल्याची कुजबूज जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Exit mobile version