| रेवदंडा | प्रतिनिधी |
चौलच्या ऐतिहासिक चंपावतीनगरीचा वारसा सांगणारे त्वष्टा कासार समाजाचा तांबा व पितळेची भांडी घडविण्याचा व्यवसाय आधुनिक स्टीलच्या जमान्यात पूर्णतः डबघाईस आला असून, नाममात्र अस्तित्व टिकवून आहे.
रेवदंडा व चौलच्या ऐतिहासिक चंपावतीनगरीत अंदाजे तीनशे वर्षापासून तांबा पितळेची भांडी बनविण्याचे मोठे कारखाने अस्तित्वात होते. या समाजाचे दैवत महाकाली मातेचे प्राचीत मंदिर चौल बेलाई येथे आहे. तांबापितळेची भांडी बनविण्याच्या व्यवसायासह बांगड्यांचा पारंपरिक व्यवसाय सुध्दा हा त्वष्टा कासार समाजाचा आहे. आजही त्वष्टा कासार समाज बांधव रेवदंडा व चौलमध्ये असून, तांबापितळेच्या भांडी बनविण्याचा व्यवसाय अद्यापी सुरू आहे. मात्र, हा तांबापितळेची भांडी घडविणे व बनविण्याचा व्यवसाय पूर्णतः डबघाईस असून, या समाजाने इतर व्यवसायात प्रवेश घेतल्याचे दिसते.
रेवदंडा व चौलमध्ये तीनशे वर्षापूर्वीपासून सन 1975 पर्यंत तांबापितळेची भांडी बनविणे, विक्री करणे, तसेच तांबा पितळेच्या भांड्यांना कल्हई लावणे आदी त्वष्टा कासार समाजाचा व्यवसाय जोमाने सुरू होता. प्रामुख्याने वडके, दांडेकर, आदी त्वष्टा कासार समाज बांधवाचे तांबा पितळेची भांडी बनविण्याचे कारखाने येथे होते. सन 1975-76 पर्यंत हे रेवदंडा व चौल मध्ये तांबा पितळेची भांडी बनविण्याचे कारखाने सुरू होते, मात्र स्टिलची भांडी स्वस्त दरात उपलब्ध होवू लागल्याने तसेच प्रवासात प्लास्टीक बाटल्या व इतर धातूची भांडी उत्पादने स्वस्त दरात मिळू लागल्याने तांबा पितळेच्या भांड्यांची मागणी आपोआप कमी झाली. त्यामुळे रेवदंडा व चौलमधील त्वष्टा कासार समाजाचे तांबा व पितळेची भांडी बनविण्याचे कारखाने बंद पडले. येथील त्वष्टा कासार समाजाचा तांबापितळेची भांडी बनविणे, कल्हई लावणे आदी व्यवसाय हळूहळू डबघाईस आले. येथील त्वष्टा कासार समाजाने इतर व्यवसायात प्रवेश करून उपजीविकेचे साधन बनविले आहे. रेवदंडा येथे त्वष्टा कासार समाजाचे वडके, दांडेकर हे समाज बांधवानी इतर व्यवसायात प्रवेश केला आहे, मात्र इतर व्यवसायाशी संलग्न राहून तांबा, पितळेची भांडी मागणीनुसार नव्याने बनवून देत आहेत. केसरीनाथ वडके यांनी सुध्दा इतर व्यवसाय करत असून जोड व्यवसाय म्हणून मागणीनुसार तांबापितळेची भांडी बनविणे व विक्री करणे हा पूर्वपार व्यवसाय सांभाळीत आहेत. तांबापितळेची भांडी बनविणे व्यवसायात झालेल्या पिछेहाटीने येथील त्वष्टा कासार समाज नोकरी व व्यवसायाचेे निमित्ताने विखुरला गेला आहे.
स्टीलच्या जमान्यात तांबा- पितळेची भांडी हद्दपार
