श्रीवर्धन तालुक्यातून कोरोना हद्दपारीच्या मार्गावर?

। श्रीवर्धन । वार्ताहर ।
महाराष्ट्रातील कोरोना प्रादुर्भावाची सुमारे दीड वर्षांपूर्वीची भयानक परिस्थिती आणि यंदाची विशेषतः सप्टेंबर 2021 या महिन्यातील परिस्थिती पाहिली तर त्यात बदल दिसून येत आहेत. गेले वर्षभर साधारणपणे दररोज 10 ते 12 च्या दरम्यान असणार्‍या श्रीवर्धन तालुक्यातील नवीन कोरोनाग्रस्तांची संख्या सप्टेंबरमध्ये एकच्या पुढे गेलेली दिसत नाही.
बर्‍याच वेळा तर ती शून्यच दिसते. हा सारा केंद्र व राज्य सरकारची वेगाने चाललेली लसीकरण मोहिम,मास्क वापरणे,सॅनिटायझेशन,गर्दी टाळण्यासाठी शासनाने घालून दिलेले निर्बंध आणि या सर्व प्रयत्नांना नागरिक मनापासून देत असलेला प्रतिसाद याचेच परिपाक आहे. लसीकरणाचे दोन डोस घेतलेल्यांनाच मुंबईत लोकलने प्रवास करण्याची मुभा, प्रार्थनास्थळांत प्रत्यक्ष न जाता परमेश्‍वराचे ऑनलाईन दर्शन घेणे,विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्ण तयारी झाल्याशिवाय शाळा-कॉलेजे सुरु न करणे असे काही निर्णय कटु वाटत असले तरी ते जनहिताच्या दृष्टीने योग्य ठरत आहेत. शासन,प्रशासन आणि सर्वच समाजघटकांचे मनापासून सहकार्य मिळत राहिल्यामुळे श्रीवर्धन तालुक्यातून कोरोना हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे.

Exit mobile version