125 रुग्ण उपचाराने सुखरूप परतले
खोपोली | वार्ताहर |
खोपोली येथे सुरु करण्यात आलेले मोफत कोरोना रुग्णालय सर्वसामान्यांनासाठी वरदान ठरले असून, आतापर्यंत या रुग्णालयातून 125 बाधितांवर यशस्वीपणे उपचार करुन त्यांना कोरोनामुक्त करण्यात आले आहे.
कोरोनाच्या साथीत खोपोली परिसरात मोठ्या प्रमाणात जीव गमवावे लागले होते.शिवाय योग्य उपचार मिळत नसल्याने बाधित रुग्णांचेही प्रचंड हाल झाले.ती गरज लक्षात घेऊन खोपोलीतील सर्वपक्षीय नेते आणि खोपोली नगरपालिकेने पुढाकार घेत लोक सहभाग व सामाजिक संस्था व शासनाच्या माध्यमातून कोविड रुग्णालय सुरु करुन बाधित झालेल्यांवर मोफत उपचार सुरु केले.त्याचा फायदा परिसरातील शेकडो रुग्णांना झाला. या रुग्णालयातून आज पर्यंत 125 रुग्ण उपचार घेऊन सुखरूप घरी परतले असल्याने हे मोफत रुग्णालय गरीब जनतेला वरदान ठरले आहे.
खालापूर तालुका शिक्षण मंडळाच्या इमारती मध्ये 50 बेड चे ऑक्सिजन व व्हेटिंलेटरसह सर्व सोयीयुक्त रुग्णालय मोफत स्वरूपात सुरू केल्याने नागरिकांना काहीसा धीर आला आणि जवळपास खोपोली खालापुरातील नागरिकांची भीती घालविण्यात यश मिळाले अशी प्रतिक्रिया,माजी नगराध्यक्ष दत्ता मसूरकर, शिवसेना नेते नवीन घाटवळ यांनी व्यक्त केली.
गरीब जनतेला उपचारा साठी रुग्णालय व्हावी ही इच्छा मनाशी बाळगून खोपोली खालापुरातील सर्व राजकीय पक्ष राजकीय पायताणे बाजूला ठेवून पुढाकार घेतल्याने नागरिकांना आधार मिळाला.
सुमन औसरमल,नगराध्यक्षा
शेकापक्ष नेहमीच राजकारणापेक्षा समाजसेवेला प्राधान्य देत असतो. खोपोली येथील कोव्हीड सेंटरसाठी आम्ही राजकारण बाजुला ठेवून प्रामाणिक प्रयत्न केले. उशिरा का होईना हे कोव्हीड सेंटर सुरु होऊन आज 125 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याबाबत निश्चितच आनंद वाटतो आहे.
चित्रलेखा पाटील, शेकापक्ष महिला आघाडी प्रमुख