इंग्लंड दौर्‍यातही टीम इंडियाच्या मागे कोरोना

एका भारतीय खेळाडूला लागण; नाव मात्र गुलदस्त्यात
| लंडन | वृत्तसंस्था |
इंग्लंड दौर्‍यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघावर करोनाचं संकट आलं आहे. इंग्लंडमध्ये असणार्‍या भारतीय संघाच्या एका खेळाडूला कोरोनाची लागण झाली असून त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या खेळाडूला सध्या त्याच्या नातेवाईकाच्या घऱी क्वारंटाइन करण्यात आलं आहे. इंडियन एक्स्पेसच्या वृत्तानुसार, नंतर तो पुन्हा संघात परतेल अशी अपेक्षा आहे. गुरुवारी डरहॅममध्ये भारतीय संघ खेळाडूविना बायो बबलमध्ये परतणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या खेळाडूला घसा खवखवण्याचा त्रास जाणवत होता. यानंतर त्याची कोविड चाचणी करण्यात आली असता पॉझिटिव्ह आली. या खेळाडूच्या संपर्कात आलेल्या इतर खेळाडू आणि इतर कर्मचार्‍यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं होतं. त्यांचा विलगीकरणाचा कालावधी संपला आहे.

मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांची कोलकात्यात भेट घेतली. पण या बैठकीत झालेल्या चर्चेची कोणतीही माहिती त्यांनी बाहेर येऊ दिली नाही. इंग्लंड क्रिकेट संघावर कोरोनाचं सावट असतानाच भारतीय खेळाडूलाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. इंग्लंड संघ पाकिस्तानविरोधात एकदिवसीय मालिका पार पडली. मात्र पहिल्या एकदिवसीय सामन्याआधीच इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने संघातील सात सदस्यांना करोनाची लागण झाली असून यामध्ये तीन खेळाडू आणि चार कर्मचारी असल्याची माहिती दिली होती. यामुळे इंग्लंड संघात बदल करण्यात आले असून बेन स्टोक्सकडे कर्णधाराची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

Exit mobile version