। मुंबई । प्रतिनिधी ।
दररोज वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा एकदा मास्कसक्ती लागू करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली होती. यासंदर्भात एक सूचना पत्र देखील व्हायरल होत असून त्यावरून राज्यात पुन्हा एकदा मास्कसक्ती लागू करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मास्कसक्तीविषयी चर्चा सुरू असली, तरी राज्यात मास्कसक्ती नसल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. पुणे, पालघर आणि रायगडचा काही भाग, ठाणे या भागात थोडीफार संख्या वाढत आहे. अशातच पर्यटनस्थळ असल्यामुळे रायगडमध्ये पुन्हा निर्बंध येण्याची चर्चा सध्या सुरु आहे. त्याला अनुसरून देशाच्या केंद्रीय आरोग्य विभागाच्या लोकांनी पत्र पाठवलं आहे की या विभागांसाठी तुम्हाला रुग्णसंख्या वाढ रोखण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतील. त्या बाबतीत टास्क फोर्सच्या बैठकीत स्पष्टपणे ठरले की जिथे गर्दीची ठिकाणे आहेत, तिथे मास्क वापरण्याचे आवाहन करावे. ते सक्तीचे नाही, असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
10 ते 15 दिवस जी सध्या रुग्णवाढ झाली आहे त्या दृष्टीकोनातून गर्दीच्या बंदिस्त ठिकाणी मास्क वापरावा. खुल्या ठिकाणी त्यात शिथिलता असली तरी हरकत नाही. त्याला जोडून लसीकरण, बूस्टर डोस घ्यायला हरकत नाही अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चाचण्या वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाकडून तीन पानांची नोट काढण्यात आली असून ती सर्व जिल्हाधिकार्यांना देण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण राजेश टोपे यांनी दिले आहे.