| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
कोरोना व्हायरस हवेतून पसरतो का? याबाबत अनेक संशोधनं सुरु आहेत. परंतु, आता कोरोनाचा व्हायरस हवेतून पसरत असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. विशेष म्हणजे, जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील (डब्ल्यूएचओ) याला पुष्टी दिली आहे.
कोव्हीड 19 विषाणू हा मुख्यतः वॉटर ड्रॉपलेट्सद्वारे पसरतो. खोकल्यामुळे, शिंकल्यामुळे कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला होता. मात्र, वैज्ञानिकांच्या एका टीमने केलेल्या संशोधनातून कोरोना व्हायरस हवेतून पसरत असल्याचं स्पष्ट झाले आहे. हवेतील लहान कणांचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ लिन्सी मार यांच्यासह त्यांच्या टीमने केलेल्या संशोधनाचा अहवाल डब्ल्यूएचओ समोर ठेवला होता. वैज्ञानिकांनी केलेल्या या संशोधनाला जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केले आहे. कोरोना विषाणू हा हवेतून पसरतो, ही माहिती आता त्यांनी अधिकृत संकेतस्थळावर समाविष्ट केली आहे.
2020मध्ये जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले होते. भारतात मार्च 2020 मध्ये कोरोना आला. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसर्या लाटेत अनेकांना जीव गमवावा लागला होता. लसीकरणामुळे कोरोनाची लाट आटोक्यात आली. मात्र नवनवे व्हेरिएंट समोर येत आहेत. आता तर कोरोना विषाणू हवेतून पसरत असल्याचं समोर आल्याचे चिंता व्यक्त केली जातेय
धोका कायम!
जगभरासह देशातील कोरोना संसर्ग अद्यापही कायम आहे. देशात कोरोनाच्या सबव्हेरियंटसह कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. देशात एक हजार 604 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात काल 1574 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. तर गेल्या 24 तासांत देशात आठ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, काल ही संख्या 19 इतकी होती. तर, महाराष्ट्रात कोरोनाच्या 319 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, 406 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाच्या नवीन एक्सबीबी व्हेरियंटचे एकूण 36 रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे पुण्यातील आहेत.