। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत असून, तिसर्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज होत आहे. कोरोना प्रादुर्भाव तसेच त्यामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेणे गरजेचे असून, 8 ते 14 आक्टोबर दरम्यान रायगड जिल्ह्यात मिशन कवच कुंडल नावाने विशेष कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी दिली आहे. तसेच नवरात्री विशेष म्हणून महिलांसाठी 11 ऑक्टबर रोजी विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात विशेष कोरोना लसीकरण मोहिमेसाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामधील प्रत्येक गावासाठीचे स्वतंत्र नियोजन करण्यात येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रत्येक गावाच्या लोकसंख्येनुसार तसेच शिल्लक राहीलेल्या लाभार्थीच्या संख्येनुसार प्रत्येक दिवशी लसीकरण सत्र आयोजित करण्याची सूचना देण्यात आल्या असून, प्रत्येक गावासाठी टीम निश्चित करून लसीकरण पुर्ण करण्यात येणार आहे. एका गावाचे लसीकरण पुर्ण झाल्यानंतर दुसर्या गावाचे लसीकरण ही टीम पूर्ण करेल अशा प्रकारे संपूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्राचे पहिल्या डोसचे प्राधान्याने तसेच दुसरा डोस देय असलेल्या लाभार्थीचे लसीकरण करण्यात येईल.
लसीकरण मोहिमेत आरोग्य विभागासोबत इतर विभागांची मदत घेतली जाणार आहे. लसीकरण ठिकाणची व्यवस्था लाभार्थीना लसीकरण ठिकाणी बोलावण्याची जबाबदारी इतर विभागाच्या कर्मचार्यांवर सोपविण्यात आली आहे. शिल्लक राहीलेल्या सर्व लाभार्थ्यांना यादीनुसार लसीकरण ठिकाणी बोलाविण्यासाठी हे कर्मचारी मदत करतील.
लसीकरण मोहिमेची जनजागृती करण्यात आली आहे. यासाठी दबंडी देणे, मायकिंग, गृहभेटी इत्यादी माध्यमांचा वापर करण्यात आले. यामुळे लसीकरण सत्रासाठी लाभार्थीचा चांगला प्रतिसाद मिळण्यासाठी मदत होनार आहे. सदर मोहीम रायगड जिल्हयात यशस्वीपणे राबवावी व जास्तीत जास्त लाभार्थींचे लसीकरण पूर्ण करावे, असे आवाहन डॉ. किरण पाटील व डॉ. सुधाकर मोरे यांनी केले आहे.




