। लखनऊ । वृत्तसंस्था ।
पंजाब काँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्या नेतृत्वात उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे जाणार्या वाहन मार्चला पोलिसांनी रोखलं. उत्तर प्रदेश पोलिसांनी हरियाणा उत्तर प्रदेश सीमेवर हा मार्च रोखला.
तसेच शाहजहापूरमध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. लखीमपूरला जाण्याचा प्रयत्न करणार्या प्रियंका गांधी, राहुल गांधी यांच्यानंतर आता नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावरही पोलीस कारवाई झाल्यानं काँग्रेस आक्रमक झालीय. पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री झालेली पाहायला मिळाली. गाडी मार्चमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलीस कारवाईनंतर रस्त्यावरच धरणं आंदोलन सुरू केलंय.
गाडी मार्च रोखल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी उत्तर प्रदेश पोलिसांना चांगलंच फैलावर घेतलं. ते म्हणाले, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय शर्मा आणि त्यांचा मुलगा कायद्यापेक्षा मोठा आहे का? त्यांना अटक का केली नाही? त्यांनी शेतकर्यांच्या पाठीवर गाडी घालून चिरडलंय. तुम्ही त्यांना काही म्हणणार नाही आणि आम्हाला कायदा शिकवणार. तुम्ही निवडक लोकांना पुढे जाऊ द्या, नाहीतर तुम्हाला आम्हाला मारायचं असेल तर मारा, आम्ही जाणारच.