सर्वोच्च न्यायालयात कोरोनाचा शिरकाव

चार न्यायाधीश पॉझिटीव्ह
खटल्यांच्या प्रत्यक्ष सुनावणीवर बंदी
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
देशात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. आता सर्वोच्च न्यायालयातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायाधीश कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. याआधी गुरुवारी सुप्रीम कोर्टाचे दोन न्यायाधीश कोव्हिड पॉझिटिव्ह आढळले होते. याशिवाय, रजिस्ट्री विभागातील सुमारे 150 कर्मचारीदेखील पॉझिटिव्ह असून, क्वारंटाईनमध्ये आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या सूत्रांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी न्यायमूर्ती आर सुभाष रेड्डी यांच्या निरोप समारंभात एक न्यायाधीश, ज्यांना ताप होता, तेही उपस्थित होते. नंतर त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर, गुरुवारी सरन्यायाधीश एनव्ही रमण आणि इतर चार वरिष्ठ न्यायाधीशांनी याबाबत बैठक घेतली. या बैठकीत निर्णय घेण्यात आला की, आता न्यायाधीश न्यायालयाऐवजी त्यांच्या निवासस्थानातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी घेतील आणि केवळ तातडीची प्रकरणे, नवीन प्रकरणे, जामीन प्रकरणे, स्थगिती संदर्भातील संबंधित प्रकरणे, अटकेची प्रकरणे आणि निश्‍चित तारखांच्या प्रकरणांवर 10 जानेवारी पासून सुनावणी केली जाईल.
या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, 7 जानेवारीपासून पुढे सर्व प्रकरणांची सुनावणी व्हर्च्युअल पद्धतीने होईल आणि निवासी कार्यालयांमध्ये न्यायाधीश बसून निर्णय देतील.

Exit mobile version