। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसचा जगभरात उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही 29 कोटींच्या वर गेली असून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काही ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याच दरम्यान चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. देशात धोका वाढला असून कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. रुग्णांच्या संख्येने तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असताना धडकी भरवणारी आकडेवारी सातत्याने समोर येत आहे.
गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून आता टेन्शन वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. 24 तासांत 90 हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. एका दिवसात तब्बल 56 टक्क्यांनी रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (6 जानेवारी) देशात 24 तासांत कोरोनाचे 90,928 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 325 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 4,82,876 वर पोहोचला आहे. तसेच देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 2,85,401 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 3,43,41,009 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
