अलिबागमध्ये रंगला राज्याभिषेक सोहळा

विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

| अलिबाग | प्रतिनिधी |

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्या निमित्त अलिबागमध्ये धाकि, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळपासून रात्रीपर्यंत राबविलेल्या विविध उपक्रमांचा आनंद अलिबागकारांनी मनमुदारपणे लुटला.

यावेळी अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, माजी उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल, माजी नगरसेवक संजना कीर, अनिल चोपडा आदी मान्यवर उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज चौक उत्सव समिती अलिबागच्यावतीने श्री शिवराजाभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. अलिबागमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हा सोहळा पार पडला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याजवळ सकाळी ध्वज पुजन करण्यात आले. सायंकाळी कुलाबा ढोल ताशा ध्वज पथकामार्फत महाराजांना मानवंदना देण्यात आली. ढोल पथकाच्या आवाजाने संपुर्ण शहर दुमदूमून गेला. एक वेगळा उत्साह आनंद यातून दिसून आला. यावेळी मंगलमुर्ती वाद्य पथकाद्वारे मानवंदना देण्यात आली.

जय हनुमान लाठी काठी आखाडा भोनंग व अलिबाग मार्शल आर्टस्‌‍ अकादमी लाठी काठी व मर्दानी खेळाचे सादरीकरण करण्यात आले. स्ट्रींग फॅमिली प्रस्तुत सूर मराठी मातीचा उत्सव शिवस्वराज्याचा हा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आली. वेगवेगळ्या पोवाडा, गीतांचा आनंद प्रेक्षकांनी मनमुरादपणे लुटला. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करीत कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.

Exit mobile version