। पुणे । प्रतिनिधी ।
देशात सध्या दिल्या जाणार्या करोना लसींमध्ये सर्वाधिक वाटा हा सिरम इन्स्टिट्युटकडून उत्पादित केल्या जाणार्या कोविशिल्ड लसीचा आहे. त्यामुळे सिरमकडूनच 18 वयोगटापेक्षाही खालच्या आणि थेट तीन वर्षे वयाच्या मुलांना देखील देता येईल, अशा लसीची घोषणा करण्यात आली होती. या लसीवर व्यापक प्रमाणात संशोधन करण्यात येत होतं. अखेर त्याच्या चाचण्यांच्या निष्कर्षांवर भाष्य करताना अदर पूनावाला यांनी ही लस कधी येईल याविषयी मोठी घोषणा केली आहे.
अदर पूनावाला यांना सीआयआय अर्थात कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री या संस्थेकडून चर्चासत्रात आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी बोलताना अदर पूनावाला यांनी लहान मुलांसाठीच्या कोवावॅक्स या लसीच्या घेण्यात येत असलेल्या चाचण्या आणि त्याचे निष्कर्ष याविषयी माहिती दिली. लहान मुलांसाठी असलेली आमची कोवावॅक्स ही व्हॅक्सिन सध्या चाचणी स्तरावर आहे. पण तिच्या चाचण्यांचे अतिशय उत्तम निष्कर्ष दिसत आहेत. अगदी 3 वर्षे वयाच्या मुलांवर देखील या लसीची चाचणी करण्यात आली आहे. चाचण्यांमधून येणार्या निष्कर्षांचा विचार करता लहान मुलांसाठीची आमची लस येत्या सहा महिन्यांत लाँच केली जाईल, असे अदर पूनावाला म्हणाले.
दरम्यान, सध्या सुरू असलेल्या लसीकरणामध्ये मागणीपेक्षा पुरवठा अधिक झाल्याचे अदर पूनावाला यांनी यावेळी सांगितले. सध्या जगभरात करोना लसींचा पुरवठा हा जगभरातील देश हाताळू शकतील यापेक्षा जास्त आहे. या देशांमध्ये लसीकरणाचा वेग आणि प्रमाण जरी कमी असलं, तरी लसीकरण करण्यासाठीची व्यवस्था कमी असल्यामुळे त्यांच्याकडून लसींची मागणी घटली आहे, असं अदर पूनावाला यांनी सांगितले.