जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांमध्ये नगरसेवक वाढले

सदस्य संख्या झाली 196, नव्याने 26 सदस्यांची पडली भर
। अलिबाग । भारत रांजणकर ।
जिल्ह्यातील अलिबाग, खोपोली, महाड, माथेरान, मुरुड-जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन आणि उरण या नऊ नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहिर करण्यात आली आहे. त्यानुसार नऊ नगर परिषदांच्या सदस्यांच्या संख्येमध्ये 26 नवीन सदस्यांची भर पडणार आहे. त्यामुळे आता एकुण नगरसेवक संख्या 196 झाली आहे. प्रभाग रचना जाहिर झाल्यामुळे आता सर्वांचे लक्ष आरक्षण कधी निघणार याकडे लागले आहे. त्यामुळे आताच निवडणूकीचे वातावरण निर्माण होत आहे.

प्रभाग रचना करण्याचे जवळ-जवळ आता पुरेसे सोपस्कार पूर्ण होत आले आहेत. नऊ नगरपरिषदेमध्ये आधी 170 नगरसेवकांना निवडून दिले होते. मात्र आता नव्याने करण्यात आलेल्या प्रभाग रचनेमुळे 196 सदस्यांना निवडून द्यावे लागणार आहे. या वर्षी नगर परिषदांमध्ये 26 अधिक सदस्य राहणार आहेत. त्यामुळे सत्ताधार्‍यांसह विरोधकांना नऊ नगर परिषदेमध्ये किमान 196 उमेदवार उभे करुन त्यांना निवडून आणावे लागणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची कसोटी लागणार असली तरी नाराजांना खुष देखील करता येणार आहे. काहीच दिवसांनी आरक्षण जाहिर करावे लागणार आहेत. त्या दिशेन प्रशासनाची तयारी सुरु आहे. आरक्षणाचे चित्र स्पष्ट झाल्यावर खर्‍या अर्थाने कोणते उमेदवार निवडणूकीच्या आखाड्यात दोन हात करण्यासाठी उतरणार याचीही स्पष्टता होणार आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांचे आता आरक्षणाकडे डोळे लागले आहेत.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग, खोपोली, पेण, मुरुड-जंजिरा, रोहा, महाड, माथेरान, श्रीवर्धन आणि उरण या नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी सादर करण्यात आलेल्या अंतिम प्रभाग रचनेस व परिशिष्टांना अंतिम मान्यता देण्यात आली आहे. हे आदेश विचारात घेऊन रायगड जिल्ह्यातील अलिबाग, महाड, माथेरान, मुरुड जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन व उरण या नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी अंतिम प्रभाग रचना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर, संबंधित नगरपरिषदांच्या संकेतस्थळावर तसेच नोटीस बोर्डावर 7 जून 2022 पासून प्रसिध्द करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी जाहीर केले आहे.

असे वाढणार सदस्य
अलिबाग, महाड, माथेरान, मुरुड, रोहा आणि श्रीवर्धन या सहा नगर परिषदेमध्ये आधी प्रत्येकी 17 सदस्य संख्या होती आता प्रभाग रचनेमध्ये बदल झाल्याने सदस्य संख्या प्रत्येकी तीनने वाढून ती 20 झाली आहे. खोपोली नगर परिषदेमध्ये आधी 29 सदस्य संख्या होती आता प्रभाग रचनेमध्ये बदल झाल्याने सदस्य संख्या दोनने वाढून ती 31 झाली आहे. पेण नगर परिषदेमध्ये आधी 21 सदस्य संख्या होती आता प्रभाग रचनेमध्ये बदल झाल्याने सदस्य संख्या तीनने वाढून ती 24 झाली आहे. तसेच उरण नगर परिषदेमध्ये तीन सदस्य वाढले आहेत. येथे 21 सदस्य निवडून द्यावे लागणार आहेत. आधी 18 सदस्य संख्या होती.

Exit mobile version