कॉरिडोअरबाधित शेतकरी आक्रमक

जिल्हाधिकारी कार्यालयावर 22 फेब्रुवारीला धडकणार

| चिरनेर | प्रतिनिधी |

विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेकरिता रायगड जिल्ह्यातील उरण, पेण, पनवेल, अलिबाग तालुक्यातील गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनी अल्प मोबदल्यात संपादित करू पाहणाऱ्या शासनाविरोधात अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर दि. 22 फेब्रुवारी रोजी शेतकरी मोर्चाच्या माध्यमातून धडकणार आहेत. यावेळी विविध पक्षातील नेतेमंडळी या मोर्चात सहभागी होणार आहेत.

शासन शेतकऱ्यांची दिशाभूल करीत कवडीमोल भावात शेतकऱ्यांच्या सोन्याहून अधिक किमतीच्या जमिनी संपादित करू पाहात आहेत. त्याला विरोध दर्शविण्यासाठी सर्वपक्षीय नेतेमंडळींच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघर्ष समितीने या नियोजित मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात सर्वपक्षीय नेते तसेच तीन हजारच्या वर शेतकरी सहभागी होणार आहेत. या मोर्चाबरोबरच शेतकऱ्यांनी न्यायालयीन लढाई लढण्याचीदेखील तयारी केली आहे. मोर्चाच्या संदर्भात उरण तालुक्यात गावोगावी शेतकऱ्यांच्या सभा घेण्यात आल्या. यातील शेवटची सभा चिरनेर ग्रामपंचायत येथे पार पडली. यावेळी उपस्थितांनी शासन शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करताना 2013 च्या केंद्रीय कायद्याला कशी बगल देत आहे याचे विश्लेषण केले. त्याचबरोबर उरणमधील जेएनपीए बंदर, ओएनजीसी, बीपीसीएलसारखे केंद्रीय प्रकल्प हाकेच्या अंतरावर आहेत. विमानतळ, अटल सेतुमुळे हाकेच्या अंतरावरील या भागाला सरकारने तिसरी मुंबई म्हणून घोषित केली असताना या महत्त्वपूर्ण जमिनींचा रेडीरेकनरचा दर अत्यंत अत्यल्प असा घोषित केला आहे.

त्याचबरोबर उपजिल्हाधिकारी भूसंपादन अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी गेले दोन वर्ष शेतकऱ्यांसोबत कमीत कमी सात ते आठ बैठका घेतल्या आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी केलेली एकही मागणी त्यांनी विचारात घेतली नाही. या शेतकऱ्यांच्या महत्त्वपूर्ण मागण्या त्यांच्याकडून वरिष्ठांपर्यंत पोहोचल्याच नाहीत, असा शेतकऱ्यांचा आक्षेप आहे. तसेच शेतकऱ्यांना दिलेल्या भूसंपादनाच्या एकाच नोटिसीमध्ये 25 टक्क्यांचे आमिष, सक्तीने भूसंपादन करण्याची धमकी व संमतीपत्रक लिहून देण्यासाठी विनंती करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी दत्तात्रेय नवले यांच्याबाबत शाशंकता निर्माण होते.

या मोर्चात सर्वपक्षीय कमिटीचे नेते, आमदार जयंत पाटील, आ. महेश बालदी, शिवसेना नेते बबन पाटील, शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख माजी आ. मनोहर भोईर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, माजी आ. बाळाराम पाटील, माजी आ. पंडित पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जनरल सेक्रेटरी प्रशांत पाटील, 95 गाव प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष ॲड. सुरेश ठाकूर तसेच शिवसेना तालुका प्रमुख संतोष ठाकूर, जेएनपीटी विश्वस्त भूषण पाटील, उरण सा. संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, सचिव संतोष पवार इ. सहभागी होणार आहेत.

Exit mobile version