पन्नास हजारांची लाच पडली महागात
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
इलेक्ट्रीकल्स कंपनीच्या कामाचा सुसाध्यता अहवाल देण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागण्यात आली. महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता यांना ही लाच महागात पडली. नवी मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकून लाच घेताना त्यांना रंगेहाथ पकडले. ही घटना गुरुवारी घडली असून, याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित रेवानंद मोरे (32) असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. हा अधिकारी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये तळोजा येथे सहाय्यक अभियंता या पदावर कार्यरत आहे. इलेक्ट्रीक कंपनीच्या कामाचा सुसाध्यता अहवाल मिळविण्यासाठी या कार्यालयात तक्रारदाराने अर्ज केला होता. मात्र, रोहित मोरे यांनी हा अहवाल देण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच 13 जुलै रोजी मागितली. अखेर तक्रारदाराने नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक कार्यालयात तक्रार केली. घटनेचे गांभीर्य ओळखून उपअधीक्षक धर्मराज सोनके यांनी कारवाईची मोहीम हाती घेतली. तक्रारीच्या पडताळणीनंतर मोरे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गुरुवारी (दि. 23) पथकामार्फत सापळा रचून 50 हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडले. त्यामध्ये पाचशेच्या 100च्या नोटांचा समावेश होता. धर्मराज सोनके यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाईत त्यांच्या पथकाचे मोलाचे योगदान राहिले.






