‘या’ ग्रामपंचायतीच्या कारभारात भ्रष्टाचार

प्रशासकीय अधिकार्‍यांचे दुर्लक्ष
ग्रामसेवकाची बदली करण्याची मागणी
| उरण | वार्ताहर |
गेल्या अनेक वर्षांपासून ग्रुप ग्रामपंचायत चाणजेच्या भ्रष्टाचार कारभाराची चौकशी सुरू आहे. तसेच काही विद्यमान सदस्यांवर कारवाईचे पत्र येऊनही त्यांच्यावर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने चाणजे ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचार दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे अशा ग्रामपंचायतची चौकशी करून भ्रष्टाचाराला खतपाणी घालणार्‍या विद्यमान ग्रामसेवक पालकर व त्यांना साथ देणार्‍या ग्रामपंचायत सदस्यांवर कारवाई करून ग्रामसेवकाची तडकाफडकी बदली करण्यात यावी, अशा प्रकारची मागणी उरणमधील सामाजिक कार्यकर्ते सचिन रमेश डाऊर यांनी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे केली आहे.

चाणजे ग्रामपंचायतीमध्ये अनेक वर्षांपासून भ्रष्टाचार चालू आहे. त्यातच नव्याने रुजू झालेले ग्रामसेवक श्री. पालकर यांनी त्यात आणखीनच भर घातली आहे. पालकर यांना काही विचारले असता ते उडवाउडवीची उत्तरे देत असून, गुन्हा दाखल करण्याची धमकी देत आहेत. पालकर यांनी ज्या ज्या ठिकाणी ग्रामसेवक म्हणून काम केले, त्या त्या ठिकाणी भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आणि, पालकर यांना ग्रामपंचायत सदस्य पाठिंबा देत आहेत. त्यामुळे पालकर यांची बदली करून त्या ठिकाणी पूर्वी असलेली वैभव पाटील यांचे निवड करावी. तसेच ग्रामसेवकाचे मुख्यालय चाणजे ग्रामपंचायत मध्ये ठेवण्यात यावे जेणेकरून भ्रष्टाचाराला आळा बसेल, असे सचिन डाऊर यांनी आपल्या निवेदनपर पत्रात नमूद केले आहे.

वर्षानुवर्षे चाणजे ग्रामपंचायत मध्ये चाललेला भ्रष्टाचार थांबेल तरी कधी? भ्रष्टाचार करणार्‍यांवर कारवाई होणार का? असा सवाल जनतेतून उपस्थित केला जात असून, कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई होत नसल्याने जनतेतून आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. – सचिन डाऊर, करंजा-उरण

Exit mobile version