। उरण । वार्ताहर ।
ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये 1+2 मजल्याच्या परवानगी असतानाही उरणमधील अनेक ग्रामपंचायतमध्ये या नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीर मजल्यावर मजले उभे करीत आहेत.
चाणजे ग्रामपंचायतमध्ये अशा बेकायदेशीर तसेच सीआरझेड कायद्याचे ही उल्लंघन करून अनेक इमारती उभ्या रहात आहेत. याबाबत ग्रामपंचायत प्रशासन उडवाउडवीची उत्तरे देते तर पंचायत समितीचे अधिकारीही कारवाई करण्यास राजी नसल्याचे दिसते. तरी याबाबत जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी याप्रकरणी लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अशा प्रकारच्या इमारती तालुक्यातील इतर ग्रामपंचायतमध्ये उभ्या रहात असल्याची माहिती काही सदस्य देत आहेत.
चाणजे ग्रामपंचायत हद्दीमध्ये अनेक ठिकाणी शासकीय जागा बळकावून त्याठिकाणी बेकायदेशीरपणे चार ते पाच मजली इमारती बिनधास्तपणे उभ्या रहात आहेत. काही इमारती शासकीय जागेवर उभ्या असल्याचे समजते. तर काही ठिकाणी घर न बाधतांच सबधितांना घर नंबर देण्यात आल्याचे ग्रामस्थ सांगतात. तर काही ठिकाणी व्यवसायिकाला व्यवसाय करण्याआधीच त्या जागेपर्यंत वीज व पाण्याचे कनेक्शन देऊन ठेवण्यात आले आहेत. यासाठी ग्रामपंचायतीही कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे ग्रामसेवक दिलीप तुरे यांनी सांगितले.
त. विशेष म्हणजे समुद्र किनारी सीआरझेड कायदा आहे. त्याचेही उल्लंघन करून इमारती उभ्या रहात आहेत. त्यांच्यावर मग ग्रामपंचायत कारवाईचा बडगा का उगारत नाही असा सवाल उपस्थित होत आहे. चाणजे ग्रामपंचायतमध्ये बेकायदेशीर 4 ते 5 मजली इमारत उभ्या रहात आहेत. याबाबत त्यांच्यावर का कारवाई होत नाही. पंचायत समिती व ग्रामपंचायत प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांनी कोणाकडे दाद मागायची. या संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.
चाणजे ग्रामपंचायतचे तत्कालीन ग्रामसेवक भास्कर पालकर यांच्याकडे लेखी पत्राद्वारे कारवाईची मागणी व सदर इमारतीच्या परवानगी कशी दिली याची माहितीच्या अधिकारात व अधिकृत रकमेची पावती भरूनही आजतागायत ग्रामसेवक पालकर यांची बदली होऊनही माहिती मिळालेली नाही. यावरून उरण तालुक्यातील भ्रष्ट ग्रामपंचायतचा कारभार उरण पंचायत समितीमधील वरिष्ठ अधिकारी पाठीशी घालत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याचीही डॉ. किरण पाटील यांनी सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी पत्रकार घनश्याम कडू यांनी केली आहे.