| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील ग्रामसभांनी गावोगावातील सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत जनतेने भ्रष्टाचाराचे धिंडवडे काढत सरपंच, सदस्य व ग्रामसेवकांची बोलतीच बंद केली आहे. गावाच्या तिजोरीतून विकासकामांच्या नावाखाली लाखोंचा निधी हडप करून आपली खिसेपुर्ती करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना ग्रामस्थांनी जनसभा रंगताच जाब विचारला. ‘कागदावर विकास, प्रत्यक्षात हडपशाही’ हा प्रकार उघड करत ग्रामस्थांनी सत्ताधाऱ्यांचा पर्दाफाश केला आहे. सरपंच-ग्रामसेवक संगनमताने कधीही कुठल्याही पेपरात निविदा काढल्याशिवाय ठेकेदारांना कामे वाटली जात असल्याचा आरोप देखील ग्रामस्थांनी केला आहे. एवढेच नव्हे तर काम काहीच नाही पण कागदावर कोट्यवधींचा खर्च दाखवून पैसे वाटून घेण्याचा भ्रष्टाचार उघड झाला आहे. यापेक्षाही धक्कादायक म्हणजे, तालुक्यातील एका ग्रामपंचायतीत सरपंचांनी कोणतीही निविदा न काढता एका ठेकेदाराला थेट काम देण्याचे आदेश दिले. त्या ठेकेदाराने काम पूर्ण केले तरी त्याचे लाखों रुपयांचे बिल अद्याप थकवले आहे. परिणामी संतप्त ठेकेदाराने ग्रामपंचायतीला लेखी पत्र देऊन कामाचा ठराव घ्या, माझे बिल द्या, अन्यथा पोलिसांत तक्रार करू अशी थेट धमकी दिली आहे. या घटनेमुळे ग्रामपंचायतींचा भ्रष्ट कारभार उघडकीस येऊन तालुक्यात नाक्यांनाक्यावर चर्चा रंगली आहे.







