तरणखोप ग्रामपंचायतीमध्ये लाखोंचा भ्रष्टाचार

| पेण | प्रतिनिधी |
एक महिन्यापूर्वी केलेला भ्रष्टाचार लपवावा म्हणून तरणखोपचे सरपंच अभिजीत अशोक पाटील यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ आपल्या हाताला बांधले. यापूर्वीही पेण तालुक्यात दोन सरपंचांनी आपले सरपंचपद वाचावे म्हणून वडखळ नाक्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला होता. अभिजीत पाटील यांनी केलेला भ्रष्टाचार हा 41 लाखांचा असल्याचे लेखा परिक्षणामध्ये उघड झालेले आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मा. सभापती डी.बी. पाटील यांनी वेळोवेळी प्रसार माध्यमांना पुरावेदेखील दिलेले आहेत. तरणखोप येथील झालेल्या निधीच्या अपहारासंदर्भात उद्या बुधवार, दि. 27 रोजी जिल्हा परिषदेमध्ये सुनावणी आहे. याबाबत नक्की काय निकाल लागतोय, याकडे पेणसह रायगडच्या नजरा आहेत.

तरणखोप सरपंच अभिजीत पाटील व ग्रामसेवक विलास बारकुंड यांच्याविरुद्ध 6 ऑगस्ट 2020 रोजी ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामनिधी व 14 व्या वित्त आयोगामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याबद्दल पंचायत समिती पेण गटविकास अधिकार्‍यांना पत्र लिहिले होते. त्या पत्रानुसार गटविकास अधिकार्‍यांनी ग्रामपंचायत तरणखोपचे दप्तर 1 एप्रिल 2019 ते 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत तपासले असता, जमा-खर्चामध्ये अनियमितता दिसून आली. यामध्ये ग्रामनिधी व 14 वा वित्त आयोग मिळून एकूण 41 लाख 14 हजार 547 रुपयांची अनियमितता आढळून आली. त्यानंतर गटविकास अधिकारी यांनी सरपंच अभिजीत पाटील व ग्रामसेवक विलास बारकुंड यांनी प्रत्येकी 20 लाख 57 हजार 273.50 रुपयांची जबाबदारी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958/59 कलम 57 (3) नुसार स्वीकारावी आणि अनियमितता असलेली रक्कम भरावी; अन्यथा सात दिवसांच्या आत खुलासा द्यावा. त्यानंतर सरपंच व ग्रामसेवक यांनी रकमेच्या अपहाराची जबाबदारी न स्वीकारता खुलासा दिला. मात्र, हा खुलासा गटविकास अधिकारी यांनी अमान्य केला. त्यावर सरपंच व ग्रामसेवक यांनी गटविकास अधिकार्‍यांना लेखी दिले, की आम्ही दिलेला खुलासा बरोबर आहे. मात्र, हे अमान्य असल्याने शेवटी गटविकास अधिकारी पेण यांनी 9 जुलै 2021 रोजी जिल्हा परिषदेकडे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 कलम 39 (1) नुसार सरपंचाविरुद्ध कारवाई व्हावी, तर महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा वर्तणूक नियम 1967 (3) चा भंग केला म्हणून ग्रामसेवकाविरुद्धदेखील कारवाई करावी. तर, 27 ऑगस्ट 2021 रोजीच्या पंचायत समितीच्या मासिक सभेमध्ये सरपंचाविरुद्ध कारवाई करण्याचा ठराव करण्यात आला. तसेच 23 सप्टेंबर 2021 रोजी अभिजीत पाटील व विलास बारकुंड यांच्याविरुद्ध पेण पोलीस ठाण्यात गुन्हादेखील दाखल करण्यात आला.

निधी अडवून गावाचा विकास थांबवला – डी.बी. पाटील
तरणखोप ग्रामपंचायतीचे सरपंच अभिजीत अशोक पाटील यांचा लेखा परीक्षण करून खरा चेहरा सर्वसामान्यांच्या समोर आणल्यानंतर विकासकामांना खीळ घालण्याची सुरूवात केली. जवळपास 70 लाखांचा निधी नाहरकत दाखला न दिल्यामुळे परत जाण्याच्या मार्गावर आहे. मात्र, याकडे प्रशासनही योग्य प्रकारे लक्ष देत नाही. ज्यावेळी तरणखोपसारख्या छोट्या ग्रामपंचायतीमध्ये 41 लाखांचा अपहार होतो, त्यावेळी सरपंचाबरेाबर अधिकारी वर्गही तेवढाच जबाबदार आहे. त्यामुळे जनतेच्या पैशाचा असा अपहार करणार्‍या सरपंचाविरुद्ध ठोस कारवाई होणे गरजेचे आहे. तसेच त्याला मदत करणार्‍या ग्रामसेवका विरुध्दही कारवाई करणे गरजेचे आहे. भविष्यात सरपंचावर ठोस कारवाई झाली नाही तर तरणखोप ग्रामस्थ व मी स्वतः रस्त्यावर उतरून संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा डी.बी. पाटील यांनी दिला आहे.

सुनावणी निष्पक्षपाती व्हावी
याबाबत पुराव्यासहीत रायगड जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राम.) शीतल फुंड यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र, ही शिफारस केली असली तरी त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. म्हणून पुन्हा सदरील लवाद कोकण आयुक्तांच्या दालनात गेला. मात्र, कोकण आयुक्तांनी जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकार्‍यांना सुनावणी घेण्याचे आदेश दिले असून, याची सुनावणी उद्या बुधवारी (27 ऑक्टोबर) सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. मात्र, ही सुनावणी निष्पक्षपाती होईल की नाही, याबाबत ग्रामपंचायत सदस्य तरणखोप यांच्या मनात साशंकता आहे. तरी योग्य कारवाई झाल्यास सरपंच अभिजीत पाटील यांना पदावरुन बडतर्फ केले जाईल, तसेच पैसे न भरल्यास फौजदारीलादेखील सामोरे जावे लागेल.

Exit mobile version