भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध; विभागीय आयुक्तांची कारवाई
। पेण । वार्ताहर ।
तरणखोप ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंचाने लाखोंचा भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध झाल्याने विभागीय आयुक्तांनी सरपंचपदावरुन हकालपट्टी करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकार्यांना दिले. दरम्यान, उपसरपंचपदी कार्यरत असलेले शेतकरी कामगार पक्षाचे सुनील सखाराम पाटील यांच्याकडे सरपंचपदाचा पदभार सोपविण्यात आला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून विद्यमान सरपंचावर 42 लाख 14 हजार 573 रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सिद्ध झाल्यामुळे विभागीय आयुक्तांनी दि. 30 जून 2022 रोजी सरपंच अभिजीत अशोक पाटील यांना सरपंचपदावरून व ग्रामपंचायतीमधून काढून टाकण्याचे आदेश यांना दिले असून, याबाबतची कार्यवाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार दि. 12 जुलै पेण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोमवार, दि.18 जुलै रोजी यांनी कार्यवाही केली.
दरम्यान, शेतकरी कामगार पक्षाचे उपसरपंच असलेले सुनील सखाराम पाटील यांच्याकडे सरपंचपदाचा पदभार सोपविण्यात आला. या चौकशीदरम्यान सरपंच अभिजित पाटील यांना अनेक राजकीय पक्षातील प्रमुख नेत्यांनी सहकार्य करण्यासाठी प्रयत्न केले, परंतु प्रयत्न असफल झाले. अर्जदार यांच्या वतीने अॅड. सुभाष पाटील यांनी यशस्वीपणे काम पाहिले. विशेष पाठपुरावा व मेहनत डी.बी. पाटील (काका) यांनी भ्रष्टाचाराबाबत तपशीलवार माहिती पुरवून याकामी यश मिळविले.
सरपंचाचा भ्रष्टाचार उघड करण्यासाठी माजी सभापती निलीमा पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील. मा. सभापती तथा शे.का.प. जिल्हा चिटणीस अॅड. आस्वाद पाटील, जि.प. सदस्य सुरेश खैरे, शेकापचे शिहू विभागातील प्रमुख पदाधिकारी व रायगड जिल्हा कबड्डी कार्यवाह प्रसाद भोईर, जि.प. सदस्य प्रभाकर म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य, गावातील सर्व प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी विशेष सहकार्य केले. डी.बी. पाटील यांनी नवनिर्वाचित सरपंच यांचे अभिनंदन करुन ज्यांनी ज्यांनी या कामासाठी सहकार्य केले, त्या सर्वांचे आभार मानले.