सामाजिक कार्यकर्ते राकेश आरकशी यांचा आरोप; गटविकास अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यास टाळाटाळ
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
मुरूड तालुक्यातील आंबोली ग्रामपंचायत वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. गेल्या अनेक वर्षापासून या ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकामार्फत चालत आहे. केलेल्या कामांचा आणि खरेदी केलेल्या वस्तूंचा हिशोब देण्यास टाळाटाळ होत असून, त्यामध्ये लाखोचा भ्रष्टाचार असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते राकेश आरकशी यांनी केला आहे. याबाबत मुरूडच्या गटविकास अधिकारी राजेंद्र कुमार खताल यांच्याकडे चौकशीची मागणी करण्यात आली आहे. परंतु, त्यांच्याकडून कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे आंबोली ग्रामपंचायतीसह पंचायत समितीच्या प्रशासकीय कारभाराबाबत संशय वाढल्याची चर्चा सुरु आहे.
सामाजिक कार्यकर्ते राकेश आरकशी यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुरूड तालुक्यातील आंबोली ग्रामपंचायत हद्दीत आंबोली, खारआंबोली, जोसरंजन, उंडरगाव, तिसले इत्यादी गावे व वाड्यांचा समावेश आहे. या हद्दीत सुमारे 3 हजारहून अधिक लोकसंख्या आहे. या ग्रामपंचायतीवरील राजकीय कार्यकिर्द संपल्यानंतर गेल्या अडीच वर्षांपासून या ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकीय राजवटीनुसार चालत आहे. सध्या प्रशासक म्हणून वसंत दळवी आणि ग्रामसेवक म्हणून लक्ष्मण बुंदके काम पहात आहेत. दरम्यान, दि.20 ऑगस्ट रोजी आंबोली ग्रामपंचायतीची ग्रामसभा घेण्यात आली होती. या सभेत काही ग्रामस्थांनी गावांतील विकास कामांवर दृष्टीक्षेप टाकला. तसेच, यावेळी ग्रामपंचायतीला विविध मार्गातून प्राप्त झालेल्या निधीचा वापर, अंदाजपत्रकानुसार केलेली कामे, खरेदी केलेली घंटा गाडी, फॉगीग मशीन आणि शुद्ध पाण्यासाठी बसवण्यात आलेले आर ओ प्लांट याबाबत विचारणा केली. मात्र, ग्रामपंचायतीच्या प्रशासकांकडून कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही.
गावातील कचरा संकलीत करण्यासाठी ग्रामपंचायतीने साधारणपणे 5 लाख रुपयांना घंटा गाडी विकत घेतली. प्रत्यक्ष बाजारात या गाडीची किंमत दीड लाख आहे. डासांपासून संरक्षण करण्यासाठी 1 लाख रुपयांना फॉगिंग मशीन खरेदी केली. प्रत्यक्ष बाजारात या मशीनची किंमत साधारणपणे 10 हजार रुपये आहे. तसेच, गावांमध्ये 5 लाख रुपये खर्च करून आर ओ प्लांट बसविण्यात आले. प्रत्यक्ष या प्लांटची किंमत दीड लाख रुपये आहे. जलजीवन योजनेअंतर्गत 1 कोटी 75 लाख रुपयांची योजना गावामध्ये राबविण्यात आली. मात्र, जलवाहिनी टाकण्याचे कामही निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून, करोडो रुपये खर्च करूनही अद्याप गावातील घरांमध्ये पाण्याचा एक थेंबही पोहचलेला नाही. त्यामुळे योजना राबविताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते राकेश आरकशी आणि काही ग्रामस्थांनी केला आहे.
याबाबत राकेश आरकशी यांनी, मुरूडचे गटविकास अधिकारी राजेंद्र कुमार खताल यांना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली. हे पत्र देऊन एक महिना होत आला. मात्र, गटविकास अधिकारी यांच्याकडून कारवाई करण्यास टाळाटाळ झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे आंबोली ग्रामपंचायत प्रशासक, ग्रामसेवक आणि गटविकास अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. गटविकास अधिकारी यांच्याकडून चौकशी झाली नाही, तर पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाला बसणार, असा इशारा देखील आरकशी यांनी दिला आहे. याबाबत गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार खताल आणि प्रशासक वसंत दळवी यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.
आरटीआय कार्यकर्ते राकेश आरकशी यांनी मागितलेली माहिती देण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या कामांमध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला नाही. ज्या वस्तू खरेदी केल्या त्यांची बिले उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांचे आरोप खोटे आहेत.
लक्ष्मण बेंदूक,
ग्रामविकास अधिकारी, आंबोली
गावात केलल्या कामांचा हिशोब आणि निधीचा वापर याची विचारणा ग्रामसभेत करण्यात आली. माहितीच्या अधिकारातही माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु, ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांसह प्रशासकांकडून माहिती देण्यात आली नाही. फॉगिग मशीनसह घंटागाडी खरेदीमध्ये घोटाळा अर्थात भ्रष्टाचार झाल्याचा संशय आहे. याबाबत गटविकास अधिकारी यांना पत्र देऊन चौकशी करण्याची मागणी केली. परंतु, पत्रच मिळाले नाही, असे कारण सांगून त्यांनी टाळाटाळ केली आहे.
राकेश आरकशी,
सामाजिक कार्यकर्ते
