उपोषणास बसण्याचा सत्यविजय पाटील यांचा इशारा
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
आर्थिक अपहार केल्याचा ठपका ठेवत विभागीय आयुक्तांनी मानकुळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुजित गावंड यांना पदच्युत करुन पाच महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. दरम्यान, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यास अलिबाग पंचायत समितीचे गटविकास अधिकारी टाळाटाळ करीत असल्याने त्यांच्याविरोधात शिस्तभंगाच्या कारवाईच्या मागणीसाठी माजी सरपंच सत्यविजय पाटील यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.
तालुक्यातील मानकुळे ग्रामपंचायतीचे तत्कालिन सरपंच सुजित गावंड यांनी पदावर असताना प्रशासकीय अनियमितता व आर्थिक अपहार केल्याप्रकरणी कोकण विभागीय आयुक्त यांनी दि.14 नोव्हेंबर 22 रोजी सरपंचपदावरून दूर केले. त्याबाबत महाराष्ट्र शासन निर्णय ग्राम विकास विभाग शासन परिपत्रक क्र. व्ही.पी.एम.2016/प्र. क-251/परा/-3, मुंबई 400 001 दि. 4 जानेवारी 2017 च्या आदेशानुसार तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून अप्रहुत रक्कम शासन जमा करण्याचे निर्देशदेखील देण्यात आले होते.
मात्र, सदर अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने सत्यविजय पाटील यांनी वारंवार अर्ज विनंत्या करूनदेखील गटविकास अधिकारी व प्रशासन कोणतीच कारवाई करत नसल्याचा आरोप सत्यविजय पाटील यांनी केला आहे. याबाबत पाटील यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील यांना व गटविकास अधिकारी यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन निवेदन देत कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. मात्र, या कार्यालयांकडून फौजदारी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात आहे. या कार्यालयाकडून सरपंच हे लोकसेवक पद असल्याने कारवाई करण्यास वरिष्ठ अधिकारी यांची परवानगी लागते, शासन परिपत्रक 4 जानेवारी 2017 नुसार करावी किंवा चौकशी करण्यास गटविकास अधिकारी टाळाटाळ करीत असतील तर सीईओंनी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे. याबाबत वेळोवेळी अनेक अर्ज करुनसुद्धा दाद दिली जात नाही.
जोपर्यंत खाते चौकशी सुरू आहे, तोपर्यंत कोणतीच कारवाई करता येते नाही, असे वारंवार सांगितले जाते. खाते चौकशी एक महिन्यात पूर्ण करावयाची होती, मात्र विभागीय आयुक्तांनी सुजित गावंड यांना सरपंचपदावरून दूर केल्याचे आदेश दि.14 नोव्हेंबर 2022 रोजी दिले होते. त्या आदेशापासून पाच महिने पूर्ण होत आलेत तरी संबंधित गटविकास अधिकारी व प्रशासन गाढ झोपेत असल्याची टीका सत्यविजय पाटील यांनी केली आहे. या झोपी गेलेल्या प्रशासनाविरुद्ध उपोषणास बसण्याचा आपण निर्णय घेत असल्याचा इशारा सत्यविजय पाटील यांनी दिला आहे.